जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील अयोध्या नगरात एका महिलेच्या नावावर असलेल्या २ कोटी रुपये किंमतीचे तीन प्लॉट बनावट मालकीन उभी करून विक्री करण्याच्या प्रयत्ना असलेल्या टोळीचा जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पर्दाफाश केला आहे. पथकाने या गुन्ह्यातील तीन संशयित आरोपींना अटक केली असून यात एका महिलेचा समावेश आहे. तिघांना शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील आयोध्या नगरात असलेल्या बखळ प्लॉट हा अनिता राजेंद्र नेहते यांचे नावे आहे. सध्या त्या कामानिमित्त बाहेरगावी राहतात. त्यांच्या ऐवजी बनावट महिला उभी करून त्यांच्या नावे असलेल्या २ दोन कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याची तयारी होत होती. याबाबत जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांना मिळाली. त्यानुसार पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. त्यानुसार पथकातील पोहेकॉ विजयसिंह पाटील, रवींद्र पाटील, ईश्वर पाटील, दर्शन ढाकणे, मोतीलाल चौधरी यांचे पथक तयार केले. ऑटोनगरातील संदीप हॉटेलजवळ संशयित आरोपी राजू जगदेव बोबडे (वय-४२) रा. विटनेर ता.जि.जळगाव हा पोलीसांनी दिला. त्यांच्या यापुर्वी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याने पोलीसांनी त्याला जागेवरच पकडले. त्यांची अधिक चौकशी केली असता त्याने प्रमोद वसंत पाटील (वय-४६) रा. विरावली ता. यावल आणि गंगा नारायण जाधव (वय-४२) रा. आयोध्या नगर जळगाव या इतर दोन साथीदारांची नावे सांगितली. कामानिमित्त बाहेर गावी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती काढून त्यांच्या नावावर कीती पॉपर्टी आहे याची चौकशी करून बनावट व डमी मालक व मालकीन उभे करून त्याच मालमत्ता धारकाचे बनावट आधारकार्ड व पॅनकार्ड तयार करून कमी किंमतीत विक्री करत असल्याची कबुली दिली. याच पध्दतीने अयोध्या नगरातील अनिता राजेंद्र नेहते यांचे २ कोटी रूपये किंमतीचे तीन प्लॉट विक्री करण्याच्या तयारीत होतो असेही सांगितले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. तिघांना पुढील कारवाईसाठी शहर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार संजय भांडारकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील बडगुजर, रतन गीते, रवींद्र सोनार हे करीत आहे.