मुंबई (वृत्तसंस्था) देशात सध्या विरोधी पक्षांची सरकारं खिळखिळी करण्याच्या व पाडण्याच्या ‘राजकीय विषाणू’ने धुमाकूळ घातला आहे, अशी टीका शिवसेनेने भाजपवर केली आहे.
मध्य प्रदेश व गुजरातमधील राजकारणावर शिवसेनेचे मुखपत्र दैनिक ‘सामना’च्या अग्रलेखातून भाष्य करण्यात आले आहे. अरुणाचल प्रदेश, मणिपूर, गोवा, कर्नाटक आदी राज्यांमध्ये त्याचा ‘असर’ दिसला आहे. हा ‘विषाणू’ नाकाम ठरला तो फक्त महाराष्ट्रातच. येथे हा व्हायरस चालला नाही आणि त्यांच्यावरच तो उलटला. महाराष्ट्रात शिवसेनेबरोबर सरकार स्थापन करता येत नाही याची खात्री पटताच अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र तो प्रयत्नही फसला. अर्थात तरीही सरकार पाडण्याचा किडा वळवळत राहिलाच. केंद्रातील सत्ताधारी पक्षाने हाच ‘प्रयोग’ मध्य प्रदेशात सुरू केला आहे. मध्य प्रदेशात ‘कर्नाटक’ घडते की ‘महाराष्ट्र’ हे पुढील घडामोडींवर ठरेल. कोण कोणत्या चाली खेळतो, त्यात कोणाला किती यश मिळते, या चाली यशस्वी होतात की उलटतात, राजकीय पटावरची किती प्यादी इकडून-तिकडे आणि तिकडून-इकडे होतात यावर बरंच काही अवलंबून असेल. पुन्हा यातही न्यायालयाचा भाग आलाच तर न्यायालयाचा ‘हातोडा’ कोणाच्या टाळक्यात बसतो हेदेखील महत्त्वाचे ठरेल,असेही अग्रलेखात म्हटले आहे.