नवी दिल्ली : वृत्तसंस्था । मागील २४ तासांत ५२४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृतांची संख्या वाढून १ लाख ३५ हजार २२३ वर पोहोचली आहे. सध्या देशात ४ लाख ५२ हजार, ३४४ रुग्ण उपचार घेत आहेत
दिवाळी आधी काही प्रमाणात रुग्णसंख्या कमी झाल्यानं नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. मात्र, कोरोनानं पुन्हा एकदा हातपाय पसरवण्यास सुरूवात केली असून, दिवसागणिक देशातील रुग्णसंख्येचा आकडा वेगानं वाढू लागला आहे. मृतांची संख्या वाढली असून, गेल्या २४ तासांत देशात ५०० पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाल आहे.
बाधितांच्या संख्येचा वेग वाढल्यानं केंद्र सरकारनं राज्यांना तातडीनं पावलं उचलण्याचे निर्देश दिले आहेत. प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना केल्या जात असताना गेल्या २४ तासांत मोठ्या संख्येनं नवीन रुग्ण आढळून आले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीप्रमाणे देशात गेल्या २४ तासांत ४४ हजार ४८९ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. नवीन रुग्णसंख्येची भर पडल्यानं देशातील एकूण रुग्णसंख्या ९२ लाख ६६ हजार ७०६ इतकी झाली आहे. .
महाराष्ट्रात पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजारांपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. तर ६५ जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या १८ लाखांच्या जवळ पोहोचली आहे. राज्यात दुसरी लाट येण्याची शक्यता असल्यानं सरकारनं उपाययोजना हाती घेतल्या आहेत.