चाळीसगाव प्रतिनिधी | घरासमोर स्कूटी लावत असलेल्या महिलेची दुचाकीवरून अज्ञात इसमाने गळ्यातील सोन्याची पोत लांबवल्याची घटना शहरातील श्रीपत नगरात घडली असून याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वृत्त असे की, रविंद्र साळुंखे (रा.श्रीपत नगर, भडगाव रोड ता. चाळीसगाव ) हे वरील ठिकाणी आपल्या परिवारासह वास्तव्यास असून त्यांच्या पत्नी सुमन रविंद्र साळुंखे (वय-४१) ह्या पंचायत समिती येथील शिक्षण विभागात नौकरीला आहेत. शुक्रवार, ३० रोजी दुपारी पावणेदोन वाजताच्या सुमारास सुमन साळुंखे ह्या जेवणासाठी आपल्या घरी गेल्या. दरम्यान घरासमोर स्कूटी लावत असताना अचानक दुचाकीवरून (क्र. डी.एल. ०५४६) (पूर्ण नंबर माहित नाही) दोन अज्ञात इसम जवळ येऊन थांबले. त्यातील एकाने खाली उतरून सुमन साळुंखे यांच्या मानेवर थाप मारून ५६,००० रूपये किंमतीचे गळ्यातील २० ग्रॅम सोन्याची पोत लांबवली. त्यावर सुमन यांनी आरडाओरड केली. परंतु अज्ञात चोरट्यांनी धुम ठोकली. दिवसाढवळ्या झालेल्या चोरीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
या संदर्भात सुमन साळुंखे यांनी चाळीसगाव शहर पोलिस स्थानक गाठून भादंवि कलम- ३९२,३४ प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी फिर्यादीत चोरटे हे २०-२५ वर्ष वयोगटातील असतील असे नमूद केले आहे. पोलिस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुरू आहे.