ठाणे वृत्तसंस्था । दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असताना चालकाचे नियंत्रण सुटून झालेल्या दुचाकीच्या भीषण अपघातात दाम्पत्यासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना शहापूरमध्ये घडली. या अपघातात मृत दाम्पत्याचे सहा महिन्यांचे बाळ वाचले आहे.
शुक्रवारी सकाळी भातसानगरकडून सावरशेत रोडच्या दिशेने दुचाकीवरुन सोमनाथ वाख पत्नी जिजा (मुरबीचा पाडा, सरलांबे, शहापूर) आणि मेहुणा राजू मांगे (खर्डी, शहापूर) आणि सहा महिन्यांचा मुलगा स्वप्नील यांच्यासोबत जात होता. यावेळी राजू दुचाकी चालवत होता. त्यावेळी उतारावर त्याचे नियंत्रण सुटले आणि दुचाकी रस्त्यालगत असलेल्या दगडावर आदळली. त्यानंतर दुचाकी खड्ड्यात गेली. यामध्ये राजू, सोमनाथ आणि जिजा तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. अपघातात सहा महिन्यांचा स्वप्नील बचावला आहे.