मुंबई : वृत्तसंस्था । विधानपरिषदेतील प्रश्नोत्तराच्या तासात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी दिव्यांग शाळेतील शिक्षक तसेच कर्मचाऱ्यांना ७ वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. या निर्णयाची अंमलबजावणी दोन महिन्यांच्या आत करण्यात येणार असल्याचेही मुंडे यांनी सांगितले.
काँग्रेस नेते भाई जगताप तसेच आमदार जयंत आसगावकर यांनी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी आलेल्या अडचणींच्या संदर्भात अधिवेशनादरम्यान प्रश्न विचारला. त्यांनी दिव्यांग शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अन्य विभागातील कर्मचाऱ्यांप्रमाणे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार वेतन मिळावे अशी मागणी केली. त्यानंतर धनंजय मुंडे यांनी ही घोषणा केली. अधिवेशनानंतर पंधरा दिवसांच्या आत संबंधित विभागांसोबत व्यापक बैठक घेऊन हे अडसर दूर करण्यात येतील. येत्या दोन महिन्यांच्या आत सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल असेही मुंडे म्हणाले.
दिव्यांग शाळांमधील दहावी पास झालेल्या बऱ्याच विद्यार्थ्यांना, मुख्यतः कर्णबधीर विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी अडचणींना सामोरे जावे लागते, यावर राज्य शासन अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देणार का?, असा प्रश्न आमदार कपिल पाटील यांनी उपस्थित केला. त्याला उत्तर देताना, याबाबतीत सरकार सकारात्मक असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले. “राज्य सरकार दिव्यांग विद्यार्थ्यांना विशेष ज्युनिअर कॉलेज उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक असून, याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडणार आहे,” असे धनंजय मुंडे म्हणाले.
दरम्यान, दिव्यांग शाळा तसेच या शाळेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे कायम दुर्लक्ष केले जायचे, असा आरोप वेळोवेळी होत आलेला आहे. मात्र, धनंजय मुंडे यांच्या या घोषणेनंतर दिव्यांग शाळेत काम करणाऱ्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना नक्कीच दिलासा मिळेल, असे सांगितले जात आहे.