जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांवर होण्याऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुक्ताईनगर येथील डॉ. विवेक सोनवणे यांनी लाक्षणिक उपोषणाला सुरूवात केली आहे. दिव्यांग बांधवांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले असल्याची माहिती उपोषणकर्ते सोनवणे यांनी लाईव्ह ट्रेन्डस न्यूजशी बोलतांना दिली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासन दरवर्षी दिव्यांग बांधवांसाठी १ हजार ५०० कोटी रूपये खर्च करते. परंतू काही निगरगठ्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांमुळे याचा लाभ दिव्यांग बांधवांना होतांना दिसून येत आहे. हा प्रकार जळगाव जिल्ह्यात दिसून आला आहे. शासन मान्य निर्णय अस्तित्वात असतांना प्रकरणे अधिकाऱ्यांच्या टेबलावर धुळ खात पडले आहे त्यामुळे दिव्यांग बांधवांना योजनेच्या लाभांपासून वंचित राहवे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्यातील पंचायत समिती, ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद या ठिकाणी दिसून येत आहे.
मागण्या याप्रमाणे आहेत
स्थानिक स्तरावर दिव्यांग बांधवांची नोंद करावी, ५ टक्के अखर्चित निधी लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे, घरट्टीत ५० टक्के सवलत द्यावी, दिव्यांगांना विवाह प्रोत्साहन म्हणून ५० हजाराची मदत द्यावी, व्यापारी गाळ्यामध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षणाची तरतूद करावी, अपंग बांधवांना अन्तोदय अन्न योजना लागू करावी, कोरोना काळात दिव्यांगांना १ हजार रूपये मदत जाहीर करावी, सवलतीने जमीन देण्यास मुभा असावी, स्थानिक स्वराज्य संस्थेत तीन टक्के आरक्षण द्यावे, शाळा व्यवस्थापन समिती दिव्यांगांना प्रतिनिधित्व करण्याची संधी द्यावी, यांसह विविध मागण्या करण्यात आले आहे.