पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा व भडगाव तालुक्यात तात्काळ ओला दुष्काळ जाहिर करुन सरसकट पंचानामे करण्यात यावे तसेच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी. अशा शेतकऱ्यांच्या हितार्थ मागण्यांचे निवेदन उद्धव ठाकरे शिवसेनेतर्फे उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना निवेदन देण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना नेत्या वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी, जिल्हाप्रमुख दिपकसिंग राजपुत, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख रमेश बाफना, तालुका प्रमुख शरद पाटील, नगरसेवक दत्ता जडे, दादाभाऊ चौधरी, व्यापारी सेनेचे आनंद संघवी, युवासेना उपजिल्हा युवाधिकारी संदिप जैन, शहर प्रमुख दिपक पाटील, तालुका संघटक हिलाल पाटील, भरत खंडेलवाल, अमरसिंग पाटील, प्रताप मोगरे, पप्पु जाधव, हरिष देवरे, नाना वाघ सह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही सर्व शेतकरी असून शेती हाच आमचा मुख्य व्यवसाय आहे. चालू हंगामात पावसाने मोठ्या प्रमाणात सोयाबीन, मका, ज्वारी, बाजरी, कपाशी या महत्वाच्या पिकासह फळबागांचेही आतोनात नुकसान केले आहे. त्यातून शिल्लक राहिलेले उत्पन्न गेल्या दोन दिवसापासून सुरु असलेल्या सततच्या व मुसळधार पावसाच्या माऱ्याने संपुर्णपणे पिक नष्ट झाले आहे. त्यामुळे पाचोरा – भडगांव तालुक्यातील शेतकरी हवालदील झालेला आहे. अशा अडचणीच्या अवस्थेत शेतकरी असतांना प्रशासनाने आपल्या अधिकारांचा वापर करुन शासनाच्या वरीष्ठ आदेशाची वाट न बघता तातडीने पाचोरा व भडगांव तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करावा व सरसकट पंचनामे करुन राष्ट्रीय सहाय्यता निधी व राज्याच्या मदत निधीतून व शासनाच्या अन्य तरतुदीतुन शेतकऱ्यांना दिवाळीपुर्वी एकरी ५०,०००/- (पन्नास हजार मात्र) रुपये सानुग्रह अनुदान द्यावे. तसेच पिक विमा कंपन्यांना शेतकऱ्यांच्या क्लेम प्रमाणे तातडीने पंचनामे करुन दिवाळीपूर्वी रक्कम जमा करणेबाबत आदेश व्हावेत अशा आषयाचे निवेदन उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल यांना देण्यात आले.