जळगाव प्रतिनिधी । येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवारी ३० डिसेंबर रोजी दिव्यांग मंडळात सुमारे २०५ लाभार्थ्यांनी उपस्थिती देऊन प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही पूर्ण केली.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात बुधवार २३ डिसेंबर २०२० पासून दिव्यांग मंडळ अद्ययावत सुविधांसह कार्यान्वित झाले आहे. दिव्यांग मंडळ अंतर्गत दिव्यांग व्यक्तींना दर बुधवारी प्रमाणपत्र मिळण्याबाबतची कार्यवाही सुरु झाली. सकाळी ८ वाजेपासून नाव नोंदणी करण्यासाठी दिव्यांग बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती दिली होती. त्यांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय तपासणी सकाळी ९ ते १ वाजेदरम्यान करण्यात आली. तपासणी मुख्य गेट नं. २ कडील अधिष्ठाता कार्यालयासमोरील दिव्यांग मंडळाच्या कार्यालयात झाली. तपासणीसाठी कुठलीही फी आकारली जात नाही.
दिवसभरात अस्थिव्यंग १५२, दृष्टीदोष ३२, कान-घसा ८, लहान मुलांचे २, मानसिक व इतर प्रकारचे दिव्यांगत्व असलेल्या सुमारे २०५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला. यावेळी प्र.अधिष्ठाता तथा दिव्यांग मंडळाचे समन्वयक डॉ. मारुती पोटे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैभव सोनार यांच्यासह तज्ज्ञ डॉ. आस्था गनेरीवाल, डॉ. सचिन अहिरे, डॉ. विजय कुरकुरे, डॉ. स्वप्नील कळसकर, डॉ. दिलीप महाजन, डॉ. अक्षय सरोदे, डॉ.प्रसन्न पाटील यांनी दिव्यांगांची तपासणी केली. कर्मचारी गोपाल सोळंके, चेतन निकम, आरती दुसाने, तेजस वाघ यांनी सहकार्य केले.
दिव्यांगत्व प्रमाणपत्र मिळण्यासाठी लाभार्थ्यांनी शासकीय संकेतस्थळ (www.swavlambancard.in) येथे जाऊन (Apply for Disability certificate & UDID card) या लिंकवर जाऊन अर्ज भरणे आवश्यक आहे. तेथे प्रमाणपत्र नूतनीकरणची देखील लिंक उपलब्ध आहे. या अर्जाची प्रिंट काढून अर्जासह आधारकार्ड, रेशनकार्ड, पासपोर्ट २ फोटो व जुने दिव्यांग प्रमाणपत्र तथा संबंधित कागदपत्र घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दर बुधवारी लाभार्थ्यांनी उपस्थित राहावे. येथील प्रक्रिया झाल्यावर प्रमाणपत्र घरपोच तसेच पुढील आठ दिवसात (www.swavlambancard.in) या संकेतस्थळावरून प्रिंट काढून लाभार्थ्याला मिळू शकणार आहे.