नवी दिल्ली । दिल्ली हिंसाचाराचे आज सलग दुसर्या दिवशी पडसाद उमटले असून सदस्यांनी प्रचंड गदारोळ केल्याने लोकसभा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
संसदेत झालेल्या धक्काबुक्कीनंतर आज लोकसभेचं कामकाज सुरु होताच पुन्हा एकदा गोंधळ झाला. विरोधी पक्षाच्या खासदारांकडून दिल्ली हिंसाचारवर चर्चेची मागणी करण्यात आली. यावर अध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराच्या तासानंतर चर्चा घेऊ, असं म्हटलं. तसेच, जर कुणी दुसर्या खासदाराच्या खुर्चीजवळ गेलं तर त्याला संपूर्ण सत्रासाठी निलंबित केलं जाईल, असा इशारा अध्यक्षांनी दिला. सदनात सत्ताधारी किंवा विरोधी पक्षाचा कोणताही सदस्य एकमेकांच्या खुर्चीजवळ जाणार नाही. जर असं आढळलं तर संपूर्ण सत्रासाठी त्याला निलंबित केलं जाईल. सदन याच पद्धतीनं सुरू राहील असे लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलं.
यानंतर संसदेत पुन्हा एकदा गोंधळाला सुरूवात झाली. मआपण सामान्यांना उत्तरदायी आहोत, हा विषय आम्हाला उचलू द्या. संपूर्ण दिल्ली जळतेय. देशाच्या नजरा या मुद्द्यावर लागल्यात आणि सरकारला मात्र यावर चर्चा करायची नाहीफ असं काँग्रेस खासदार आणि गटनेते अधीर रंजन चौधरी यांनी म्हटले. दरम्यान, गोंधळ वाढल्यानंतर अध्यक्षांनी सदनाचं कामकाज १२.०० वाजेपर्यंत स्थगित केलं. त्यानंतर पुन्हा एकदा १२.०० वाजता कामकाजाला सुरूवात झाली. पण नंतरही गोंधळ झाल्याने दुपारी दोन वाजेपर्यंत कामकाज थांबविण्यात आले.