दिल्ली सीमेवर ठोकलेले खिळे काढले

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । गाझीपूर सीमेवर पोलिसांनी रोडवर टोकदार खिळे रोवल्याचे फोटो आणि व्हिडीओ संपूर्ण देशात व्हायरल झाले होते. मात्र, त्यावरुन दिल्ली पोलिस आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका झाल्यानंतर हे खिळे काढण्यात येत आहेत

प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी दिल्लीच्या सीमांवर मोठी खबरदारी घेतल्याचं चित्र पहायला मिळालं. प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये झालेल्या हिंसाचारानंतर दिल्ली पोलिसांनी खबरदारी म्हणून दिल्लीच्या सीमांवर टोकदार खिळे आणि मोठ्या प्रमाणात बॅरिकेटिंग केलं आहे.

गुरुवारी सकाळी टोकदार खिळे हटवण्याचं काम करण्यात आलं आहे. जे लोक हे खिळे हटवत होते, त्यांना विचारलं असता त्यांनी याबाबत बोलण्यास नकार दिला. यावेळी दिल्ली पोलिसांचा एक कर्मचारीही तिथे उपस्थित होता, तो ही शांत होता. दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार हे खिळे आता दुसऱ्या जागी लावल्या जाणार आहेत. ज्या ठिकाणी गरज भासेल तिथे खिळे लावले जातील असं संबंधित अधिकाऱ्याने सांगितलं.

 

खिळे हटवल्यानंतर भारतीय किसान यूनियनकडून प्रतिक्रिया आली आहे की, खिळे हटवण्याचा निर्णय योग्य आहे. अशाप्रकारे नाकाबंदी करुन चर्चा होऊ शकत नाही. देर आये दुरुस्त आये. पण सरकारने असा कुठलाही निर्णय घेता कामा नये, की देशातील जनतेला वाटेल की आम्ही कुठल्या दुसऱ्या देशाच्या सीमेवर बसलो आहोत.

गाझीपूर सीमा, टिकरी बॉर्डर आणि सिंधु बॉर्डरवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. अनेक ठिकाणी लोखंडी बॅरिकेट्स लावण्यात आले आहेत. काही ठिकाणी सिमेंटचे बॅरिकेट्सही लावण्यात आले आहेत. त्याशिवया रस्त्यावर मोठमोठे खिळे ठोकण्यात आले होते. अनेक ठिकाणी भिंतीही उभारल्या आहेत. या शिवाय जमावाने दिल्लीत येऊ नये म्हणून सीमेवर टोकदार जाळ्याही लावण्यात आल्या आहेत. दिल्लीच्या सीमेभोवती एक प्रकारची तटबंदीच करण्यात आली आहे. त्यावरून राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

Protected Content