नवी दिल्ली प्रतिनिधी । दिल्ली विधानसभा निवडणुकीला केंद्रस्थानी ठेऊन भाजपने स्थापित केलेल्या केंद्रीय निवड समितीची बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थिती आज पार पडली. या बैठकीत दिल्ली विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांच्या नावांवर चर्चा झाली असून भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी येण्याची शक्यता आहे.
राज्य निवड समितीने प्रत्येक जागेसाठी दोन दोन नावे पाठवली आहेत. या बैठकीत निवडणुकीच्या प्रचाराची रणनितीवरही चर्चा केल्याची माहिती आहे. भाजप दिल्लीमध्ये छोट्या मोठ्या मिळून तब्बल 5000 बैठका घेणार आहे. दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी मतदान होणार आहे. 14 जानेवारीपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 21 जानेवारी हा अर्ज भरण्याची शेवटचा दिवस आहे. 22 जानेवारीला अर्ज छाननी होणार असून 24 जानेवारीला अर्ज मागे घेण्याचा दिवस आहे. विधानसभेच्या 70 जागांपैकी 12 जागा या आरक्षित आहे, तर 58 जागा खुल्या वर्गातील आहे. 8 फेब्रुवारीला मतदान होणार असून 11 फेब्रुवारीला याचा निकाल घोषित करण्यात येणार आहे.
दिल्लीतील सत्ताधारी आम आदमी पक्षाने आपल्या सर्वच 70 उमेदवारांची एकाचवेळी नावे घोषित केली आहे. आता काँग्रेस आणि भाजप आपले उमेदवार कधी घोषित करतात यावर सर्वांच्या नजरा आहे. मागील वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप पक्ष दुस-या क्रमांकावर होता. मात्र, त्यांना केवळ तीनच जागा मिळाल्या होत्या. 70 पैकी 67 जागांवर आपचे उमेदवार निवडून आले होते.