नवी दिल्ली : वृत्तसंस्था । दिल्लीवरून देहरादूनच्या दिशेने निघालेल्या शताब्दी एक्स्प्रेसच्या एका बोगीमध्ये आगीचा भडका उडाला. धावत्या गाडीला इंजिनपासून आठव्या बोगीत आग लागली.
काही वेळातच बोगीमध्ये झपाट्याने आग पसरली . मात्र, इमर्जन्सी ब्रेक लावून गाडी थांबवण्यात आली. तोपर्यंत आगीचे लोळ बाहेर पडू लागले होते. तातडीने बोगीतील प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं.
देहरादूनला जात असलेल्या एक्स्प्रेस गाडी रायवाला कानसरो दरम्यान असताना सी ४ बोगीमध्ये आग लागली. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. बोगीला आग लागल्यानंतर प्रसंगावधान राखत गाडी तातडीने थांबवण्यात आली. त्यानंतर बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. बोगीतून ३५ जण प्रवास करत होते. त्यानंतर आग लागलेली बोगी तातडीने वेगळी करण्यात आली. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
आग वाढत असताना बोगी वेगळी करण्यात आली. त्यानंतर अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आलं. बोगीतील प्रवाशांना दुसऱ्या बोगीत हलवण्यात आलं. त्यानंतर गाडी पुन्हा देहरादूनच्या दिशेने रवाना झाली. कानसरोजवळ ही घटना घडली असून, सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आल्याची माहिती उत्तराखंडचे पोलीस महासंचालक अशोक कुमार यांनी दिली. या आगीत पूर्ण बोगी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली. आसनाबरोबरच संपूर्ण बोगीचा जळून कोळसा झाला.