नवी दिल्ली । दिल्लीतील बिघडलेली परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस अकार्यक्षम असल्याचे नमूद करत लष्कर पाचारण करण्याची मागणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज केली आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज दिल्लीतील स्थिती हाताळण्यात दिल्ली पोलिस अकार्यक्षम आहेत त्यामुळे लष्कराला पाचारण करा अशी मागणी केली. ही मागणी त्यांनी ट्विट करुन केली. परिस्थिती धोक्याचा इशारा देत आहे असेही ते म्हणाले. या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, ”मी गेली रात्रभर अनेक लोकांशी भेटलो आहे. परिस्थिती धोक्याचा इशारा देत आहे. पोलिसांनी प्रयत्न करुनही त्यांना परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आलेले नाही, लोकांच्या मनात विश्वास निर्माण करता आलेला नाही. त्यामुळे मी आदरणीय गृहमंत्र्यांना पत्र लिहीत आहे की त्वरित लष्कराला पाचारण करुन प्रभावित क्षेत्रात तात्काळ कर्फ्यू लागू करावा.”
दरम्यान, गेल्या ४८ तासात झालेला हिंसाचार पाहता उत्तर पूर्व दिल्लीत पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच दंगल करणार्यांना दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. दिल्लीतील मौजपूर, सीलमपूर आणि गोकुळपूरी या संवेदनशील भागात अतिरिक्त फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या निवसास्थानी या संदर्भात मंत्रीमंडाळाची तातडीची बैठकही बोलावली आहे.