दिल्लीत देशातील पहिल्या ‘स्मॉग टावर’ची उभारणी

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । प्रदूषण रोखण्यासाठी  भारतातील पहिल्या स्मॉग टॉवरची उभारणी दिल्लीत करण्यात आली आहे.

 

स्मॉग टॉवरच्या माध्यमातून दिल्लीतील प्रदूषण कमी करण्याचा प्रयत्न आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या हस्ते स्मॉग टॉवरचं उद्घाटन करण्यात आलं  दिल्लीतील कनॉट प्लेस भागातील बाबा खडक सिंह मार्गावर यांची उभारणी करण्यात आली आहे. या टॉवरमुळे दिल्लीत प्रदूषण कमी करण्यास व  हवेची गुणवत्ता सुधारण्यास मदत होणार आहे. हा टॉवर प्रदूषित हवा आत घेणार आणि स्वच्छ हवा बाहेर सोडणार आहे. टॉवरच्या माध्यमातून जवळपास १ चौरस किलोमीटर क्षेत्रातील प्रदूषित हवा खेचण्याची क्षमता आहे. तर स्वच्छ हवा १० मीटर उंचीवर सोडणार आहे.

 

दिल्ली मंत्रिमंडळाने ऑक्टोबर २०२० मध्ये या योजनेला मंजुरी दिली होती. मात्र कोरोना संकटामुळे हा टॉवर उभारण्यास विलंब झाला. दुसरीकडे टॉवरची कार्यक्षमता पाहण्यासाठी दोन वर्षे निरीक्षण केलं जाणार आहे. याबाबतचा अहवाल दिल्ली सरकारला सोपवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास काही भागात या टॉवरची उभारणी केली जाणार आहे. दिल्लीतील प्रदूषण कमी करण्यासाठी या योजनेकडे मोठ्या आशेनं पाहिलं जात आहे.

 

 

हा टॉवर प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आला आहे. या टॉवरच्या कार्यक्षमता आयआयटी दिल्ली आणि आयआयटी मुंबईच्या माध्यमातून तपासली जाणार आहे”, असं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं.

 

Protected Content