खामगाव : प्रतिनिधी । फेरफार नकलेसाठी १० हजार रुपये रोकडा मोजून घेत जोडीला दारू आणि मटणाचीही फर्माईश अर्जदारांकडून पूर्ण करून घेणाऱ्या मंडळ अधिकाऱ्यासह साथीदार तलाठ्यालाही लाचलुचपत प्रतिबंधक पथकाने अलगद जाळ्यात घेरले !
प्लॉटची सातबारा नोंद घेवून फेरफार नक्कल देण्यासाठी १० हजाराची लाच घेवून दारू व मटणाच्या पार्टीवर ताव मारणाऱ्या लाचखोर मंडळ अधिकारी व तलाठ्यास एसीबीच्या पथकाने पिंप्री धनगर शिवारात एका शेतातून अटक केली आहे.
या तालुक्यातील शिर्ला नेमाने येथील ४२ वर्षीय इसमाने बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली की, लाखनवाडा येथे कार्यरत मंडळ अधिकारी विलास खेडेकर (५२, रा. गजानन कॉलनी खामगाव) व शिर्ला नेमाने येथे कार्यरत तलाठी बाबुराव मोरे (३६, रा. किन्ही महादेव ) यांनी तक्रारदाराच्या भावाच्या नावाने खरेदी केलेल्या प्लॉटची नोंद सातबारावर घेवून फेरफार नक्कल देण्यासाठी १० हजाराची लाच व दारू मटणाची पार्टी मागितली. १० हजार यापुर्वीच त्यांनी स्विकारले असल्याची तक्रार प्राप्त झाल्यानंतर बुलडाणा लाचलुचपत विभागाने सापळा रचून काल रात्री पिंप्री धनगर येथील प्रल्हाद चव्हाण यांच्या शेतातील झोपडी समोर मंडळ अधिकारी खेडेकर व तलाठी मोरे या दोघांना दारू व मटणावर ताव मारतांना अटक केली.
यावेळी पथकाने तेथून दोन व्हिस्कीच्या बाटल्या व मांसाहारी जेवणाचे पदार्थ हस्तगत केले. या कारवाईमुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. ही कारवाई एसीबीचे पोलिस उपनिरीक्षक संजय चौधरी यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक सचिन इंगळे, पो.ना. विलास साखरे, प्रवीण बैरागी, मोहम्मद रिझवान, विनोद लोखंडे, अझरुद्दीन काझी, नितीन शेटे व शेख अर्शद यांनी केली.