मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईतील दादरमध्ये ‘कोरोना’चे तीन नवे रुग्ण आढळले आहेत. यात एका हॉस्पिटलमधील दोन नर्सचा समावेश आहे. तर धारावीतही कोरोनाचे पाच नवे रुग्ण सापडले आहेत.
धारावीत आज सापडलेल्या पाच रुग्णांपैकी वोकहार्डमधील डॉक्टरच्या पत्नीचा समावेश आहे. त्या वैभव अपार्टमेंटमध्ये राहत असून हा परिसर तात्काळ सील करण्यात आला आहे. दुसरा रुग्ण हा मुस्लिम नगरमधील आहे. कल्याणवाडी येथेही ३१ वर्षीय महिलेला करोनाची लागण झाली असून मुरगन चाळ आणि पीएमजीपी कॉलनीतही प्रत्येकी एक पुरुष रुग्ण सापडला आहे. त्यामुळे धारावीतील करोना रुग्णांची संख्या २२वर गेली आहे. धारावीत आज सापडलेल्या पाच रुग्णांपैकी दोनजण दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले तबलिगी जमातचे कार्यकर्ते आहेत. दादरच्या रुग्णालयातील २७ वर्षीय आणि ४२ वर्षीय परिचारिकांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे हे रुग्णालय सील करण्यात आलं आहे. तर ८० वर्षीय वृद्धालाही ‘कोरोना’ झाल्याचे समोर आले आहे. आता दादरमधील कोरोनाबाधितांची संख्या सहावर पोहोचली आहे.