अहमदनगर, वृत्तसंस्था । राज्य शासन व महापालिकेतर्फे मास्कचा वापर करण्याचे आवाहन व सक्ती करण्यात येत असतांना मास्क न घालणाऱ्यांविरुद्ध महापालिकेतर्फे दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. अशीच कारवाई करत असतांना मास्क न लावता दुचाकीवरून जाणाऱ्या एका डॉक्टरला पथकाने अडविले असता चिडलेल्या डॉक्टरने पथकाच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला. पथकातील एकाला मारहाणही केल्याचा प्रकार घडला आहे.
अहमदनगरच्या प्रोफेसर कॉलनी चौकात शुक्रवारी सायंकाळी ही घटना घडली. महापालिका कर्मचारी विष्णू सूर्यभान देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी डॉ. पुरुषोत्तम सुंदरदास आहुजा (वय ५१, रा. रासने नगर, सावेडी, नगर) यांच्याविरूद्ध सरकारी नोकरावर हल्ला करून कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने महापालिकेने मास्क आणि इतर उपाययोजांनाची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे. विविध पथके नियुक्त करून मास्क न वापरणाऱ्यांकडून पाचशे रुपये दंड वसूल केला जात आहे. असेच एक पथक प्रोफेसर कॉलनी चौकात कारवाई करत होते. पथक प्रमुख जितेंद्र सारसर, देविदास भीमराज बिज्जा, अमित सोन्याबापू मिसाळ, आंबादास गोंट्याल आणि विष्णू देशमुख त्या पथकात होते. त्यावेळी प्रेमदान चौकाकडून एक दुचाकीस्वार विना मास्क येताना आढळून आला. देशमुख यांनी दुचाकीस्वाराला (क्र. एमएच १६ एक्स ६३१९) थांबण्याची सूचना केली. दुचाकीवर पती-पत्नी दोघेही होते. त्यांच्या तोंडावर मास्क नसल्याने देशमुख यांनी त्यांना अडविले. मात्र, दुचाकीस्वार डॉक्टरने न थांबता गाडी थेट देशमुख यांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. ‘तुला मास्क दिसतो का,’ अशी विचारणा करून त्यांनी देशमुख यांना चापटीने मारहाण केली. त्यावेळी देशमुख यांच्या डोळ्यावरील चष्म्याची काच भुवईला लागून ते जखमी झाले. तरीही दुचाकीस्वार डॉक्टरचा पळून जाण्याचा प्रयत्न सुरूच होता. तेव्हा पथकातील इतर सहकारी मदतीला आले. त्यांनी दुचाकी थांबविली. तेव्हाही डॉक्टरने सर्वांशी वाद घातला, दमबाजी आणि शिवीगाळ केली. पथकाने त्यांना नाव पत्ता विचारल्यावर ते स्वत: डॉक्टर असल्याचे लक्षात आले. त्यांना तोफखाना पोलिस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी पुढील कारवाई केली.