जळगाव प्रतिनिधी । देशात व राज्यात सध्या कोविड-१९ रोगामुळे लोकडाऊन आहे. या निमित्ताने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरता PCI, AICTE, MSBTE यांच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार पाळधी येथील त्रिमूर्ती इन्स्टिट्युट ऑफ फार्मसी महाविद्यालयात विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमावर आधारित ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन आणि वार्षिक परीक्षेच्या तयारीसाठी पूर्व परीक्षा घेण्यात आली.
लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताच्या दृष्टीने योग्य तो उपाय करण्यासाठी प्राचार्य आणि सर्व प्राध्यापकांनी व्हॉटसअपचा वापर करून बैठक घेण्यात आली. त्यानुसार मार्गदर्शन आणि सराव परीक्षा घेण्यात यावी असे ठरविण्यात आले. त्यानुसार विद्यार्थ्यांचा व्हॉट्सॲपवर एक ग्रुप तयार करण्यात आला.
ऑनलाइन पद्धतीने मार्गदर्शन हे प्राचार्य प्रांजल घोलप आणि महाविद्यालयातील शिक्षक वृंद ललित जैन, सागर पाटील, रोहित पाटील, प्रणाली थोरात, हर्षदा वाघ, पुनम पाटील यांच्याकडून देण्यात आले. विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी व्हावी यासाठी सराव प्रश्नपत्रिका तयार करून विद्यार्थ्यांची पूर्व परीक्षा घेण्यात आली आहे. संबंधित विषय शिक्षकांकडून तपासणी करून योग्य ते मार्गदर्शन करण्याचे काम सुरू आहे आणि यानंतर प्रत्याशिक परीक्षेसाठी चे मार्गदर्शन देण्यात येणार आहे.