‘त्या’ मृत कोरोना बाधित महिलेच्या वारसांना भरपाई देण्याचे आदेश

 

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा सिव्हिल रुग्णालयात प्रशासनाच्या हलगर्जीमुळे मृत अवस्थेत आढळून आलेल्या कोविडरुग्ण मालती नेहते यांच्या बाबतीत दाखल याचिकेवर औरंगाबाद खंडपिठाच्या निकालात मयत मालतीबाई नेहते यांच्या वारसांना ५ लाख रुपयांची नुकसान भरपाईचे आदेश दिले आहेत.

कोविड काळातील बंदमध्ये जिल्हा सिव्हिल रुग्णालयात दि. १० जून २०२० रोजी मालती नेहते या ८२ वर्षीय महिलेचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत तेथील शौचालयात आढळून आला होता. त्या कोविड रुग्ण होत्या व त्यांना नॉन कोविड रुग्णांसोबत ठेवले गेले होते. या घटनेने केवळ जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या संदर्भात लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे तसेच कमलाबाई देविदास भिडे व रफिक तडवी यांनी औरंगाबाद खंडपीठाकडे याचिका दाखल करून या घटनेला जबाबदार प्रशासनाला शासन व्हावे कोविड रुग्णांच्या उपचारासंदर्भात खाजगी व शासकीय रुग्णसेवा यात तातडीने सुधारणा करून मार्गदर्शक सूचना दिल्या जाव्यात व मालतीबाई यांच्या वारसांना नुकसान भरपाई देण्यात यावी याबाबतीत न्यायालयाकडे दाद मागितली होती. या बाबतीत खंडपीठाने निकाल दिला असून त्याबाबतीत पुढील आदेश जारी केले आहेत. यात राज्यशासनाने घटनेच्या आर्टिकल २१ चे उल्लंघन झाले म्हणून मालतीबाई नेहते यांच्या वारसांना ५ लाख रुपये नुकसानभरपाई निकालापासून ४ महिन्यात दिले जावेत. या घडलेल्या घटनेच्या चौकशीबाबत नियुक्त तीन सदस्यीय समिती तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी दाखल केलेल्या चौकशी अहवालानुसार आढळून आल्या दोषींवर राज्याच्या मुख्यसचिवांनी त्वरीत कार्यवाही करावी. यापूर्वीच जनस्वास्थ्य अभियान व इतर विरुद्ध महाराष्ट्र शासन या बाबतीत दि. १२ जून २०२० रोजी दिलेला निकाल आणि सिटीजन फॉर्म फॉर इक्वालिटी विरुद्ध महाराष्ट्रशासन या केस मध्ये १ जून २०२० रोजी दिलेली ऑर्डर तसेच १८ ऑगस्ट २०२० रोजी सूमोटो क्रिमिनल पीआयएल क्र १/२०२० ( रजिस्ट्रार ज्यूडीसीयल मुंबई उच्च न्यायालय अधिकारक्षेत्रातील औरंगाबाद खंडपीठ विरुद्ध भारत सरकार ) ही केस यात देण्यात आलेल्या सर्व निर्देशांचे राज्य सरकारने पालन केले जावे जेणेकरून याचिकाकर्त्यांनी मागणी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे पालन होईल. सदर निकाल हा औरंगाबाद खंड पिठाचे न्यायमूर्ती श्रीकांत डी, कुलकर्णी व एस. व्ही. गंगापूरवाला यांनी दिला असून याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड. गायत्री सिंग तसेच अंकित कुलकर्णी यांनी केस लढवली.

Protected Content