चोपडा प्रतिनिधी । शेख खालील शेख इस्माईल या माथेफिरूने लैंगीक अत्याचार करून विहरीत फेकून दिलेल्या बहिण व भावाचे मृतदेह आढळून आले असून त्यांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
याबाबत वृत्तांत असा की, शेख खलील शेख इस्माईल (२७) याने गावातील बहिण व भाऊ या दोन बालकांना बोरं खाण्याचे आमिष दाखवून गावाबाहेर शेतशिवारात नेले होते. बिडगाव रस्त्यावरील अनंत पाटील यांच्या शेतात संशयिताने बालिकेवर अत्याचार केला. मात्र, बालिकेने घटनेची वाच्यता करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे शेख खलीलने बालिकेसह तिच्या भावाला विहिरीत फेकून दिले. या घटनेत दोन्ही बालकांचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती खुद्द संशयितानेच पोलिस पाटील दिनेश पाटील यांना दिली. त्यानंतर पोलिस पाटील यांनी घटना पोलिसांना कळवली. पोलिसांनी तत्काळ संशयिताने सांगितलेले घटनास्थळ गाठले. रात्रभर विहीरीत शोध घेतल्यानंतरही मृतदेह हाती लागले नाही. त्यामुळे शुक्रवारी सकाळी पुन्हा संशयिताला घटनास्थळ दाखवण्यासाठी पोलिसांनी आणले. त्यावेळी त्याने दुसरी विहीर दाखवली. त्यामुळे पोलिसांनी दुसर्या विहीरीत शोध घेतल्यानंतर, १५ तासांनी दोन्ही बालकांचे मृतदेह हाती लागले. दरम्यान, या दोन्ही बालकांच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.