अहमदनगर । निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या वादग्रस्त वाक्याने उडालेल्या गहजबाला आज नवीन कलाटणी मिळाली आहे. ज्या दिवशी आपले कीर्तन झाल्याचा दावा करण्यात आला त्या दिवशी कीर्तन झालेच असून आपण हे वाक्य बोलले नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
खुद्द इंदोरीकर महाराजांनी वादग्रस्त वक्तव्य प्रकरणात माफी मागणारे पत्रक नुकतेच जारी केले होते. आपण जे काही बोललो आहे, ते माझ्या अभ्यासानुसार बोललो आहे. माध्यमांनी त्याचा विपर्यास केला आहे. तरीही वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो असं सांगत त्यांनी या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला होता. तरीही तृप्ती देसाई यांनी हे प्रकरण लावून धरले आहे. दरम्यान, या प्रकरणात अहमदनगरच्या जिल्हा चिकित्सक विभागाने इंदोरीकर महाराजांना नोटीस पाठवली होती. त्यावर इंदोरीकर महाराजांनी उत्तर दिलं आहे. यामध्ये ते म्हणतात की, मी तसे बोललोच नाही. ज्या तारखेचा उल्लेख करून नोटीस पाठवली, त्या तारखेला कीर्तन झालेच नाही. मात्र एका मुंबई येथील वृत्तपत्रात बातमी छापून आली होती. त्यांना कोठून पुरावे मिळाले याची विचारणा केलेली आहे. त्यांचे अद्याप उत्तर आले नाही. त्यामुळे कारवाई लगेच शक्य नाही असं अहमदनगरचे जिल्हा शल्य चिकित्सक प्रदीप मुरंबीकर यांनी स्पष्ट केलं आहे. यामुळे या प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.