जळगाव प्रतिनिधी । कौटुंबिक जाचाला कंटाळून ४० वर्षीय तरूणाने घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना रविवारी १२ जुलै रोजी रात्री उघडकीस आली होती. पोलीसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मयताच्या पत्नीसह चौघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, महादेव पंडीत शिरसाठ (वय-४०) रा. आंबेडकर नगर, कुसुंबा हे आपल्या पत्नी माला शिरसाठ, दोन मुले आणि सासू शिलाबाई रमेश भालेरावसह राहतात. एमआयडीसीतील एका कंपनीत चालक म्हणून कामाला होते. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून कौटुंबिक वाद असल्याचे घरातील वातावरण बिघडले होते. या नैराश्येतून महादेव यांनी रविवारी १२ जुलै रोजी सायंकाळी ८.३० वाजेच्या सुमारास घरात कोणीही नसतांना गळफास घेवून आत्महत्या केली होती. मयत महादेवची पत्नी माला घरी आल्यावर हा प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
आत्महत्या करण्यापुर्वी भावाला केला होता फोन
मयत महादेव याने आत्महत्या करण्याच्या दिवशी दुपारी ३ वाजेच्या सुमारास भाऊ प्रविण शिरसाठ रा. अंबरनाथ, ठाणे याला फोन केला होता की, “मला पत्नी मालाबाई महादेव शिरसाठ, सासु शिलाबाई रमेश भालेराव, पत्नीचा भाऊ उमेश रमेश भालेराव, पत्नीची वहिनी सुनिता रमेश भालेराव यांनी खूप त्रास दिला होता. त्यांनी माझे जीवन बरबाद केले. आता मी स्वत:ला संपवितो, या सर्वांना शिक्षा तू देशील, तर माझ्या आत्म्याला शांती लाभेल” असे सांगितले. दरम्यान, १५ जुलै रोजी रात्री उशीरा प्रविण शिरसाठ यांच्या फिर्यादीवरून पत्नी मालाबाई महादेव शिरसाठ, सासु शिलाबाई रमेश भालेराव, पत्नीचा भाऊ उमेश रमेश भालेराव, पत्नीची वहिनी सुनिता रमेश भालेराव यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. चौघे संशयितांना अटक केली असून सर्वांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सपोनि संदीप हजारे करीत आहे.