जयपूर (वृत्तसंस्था) आमचे युवा सहकारी सचिन पायलट व इतर आमदारांना काँग्रेसने आग्रह केला आणि विचारलं की, मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासोबत काही मतभेद असतील तर पक्षासमोर मांडावं. काँग्रेसमध्ये बहुमत तुमच्या बाजूने आहे, तर ते सिद्ध करण्यासही सांगितले होते. काँग्रेसची एक नव्हे तर दोन बैठका बोलावण्यात आल्या होत्या. त्यांनी यावं व त्यांच म्हणणं मांडावं, यासाठी अनेक वेळा विनंती करण्यात आली होती, अशी माहिती देत काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच सचिन पायलट व त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांना परत येण्याचे आवाहन देखील केले आहे.
रणदीप सुरजेवाला म्हणाले की, आमचे युवा सहकारी सचिन पायलट यांच्याविरुद्ध जड अंतकरणाने आम्हाला त्यांच्यावर कारवाई करावी लागली आहे. पक्षाने त्यांच्या युवा काळात पक्षानं अनेक पदांवर संधी देत पुढे आणलं. खासदार, केंद्रीय मंत्री, प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री आदी पदे देऊन त्यांना पुढे आणले आहे. मागील पाच दिवसांपासून काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी त्यांच्या परतीचे दरवाजे खुले ठेवले. पायलट यांच्यासोबत अनेक वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. त्यांना त्यांची भूमिका मांडण्याची विनंती केली, असेही सुरजेवाला यांनी सांगितले. तसेच सचिन पायलट यांची भूमिका आम्ही माध्यमांतून ऐकली आहे. त्यांना भाजपात जायचे नाही. जर त्यांची ही भूमिका असेल आणि त्यांना काँग्रेसमध्ये परत यायचे असेल, तर त्यांनी हरयाणातील भाजपा सरकारकडून केले जाणारे आदरातिथ्य सोडून तातडीने जयपूरला परतावे, असे आवाहन देखील सुरजेवाला यांनी केले आहे.