धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | येथील ७३ वर्षीय वयोवृद्धाला पोलिस असल्याची बतावणी करत अज्ञात दोन जणांनी हातातील ३० हजार रुपये किमतीची ६ ग्रॅमची अंगठी हात चालाखीने चोरी करून दुचाकीवर पसार झाल्याची घटना घडली आहे.
या संदर्भात पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, छगन सखाराम खैरनार (वय-७३, रा. कमल नगर, एरंडोल रोड, धरणगाव) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. १७ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता ते दुचाकीने घराकडे येत होते. त्यावेळी एरंडोल रस्त्यावरील बोहरी बंगल्याजवळ अज्ञात दोन जणांनी हात दाखवून पोलीस असल्याची बतावणी केली. त्यानंतर वयोवृत्ताच्या हातातील अंगठी काढून खिशात घालण्याचे सांगितले. अज्ञात दोन्ही भामट्यांनी हातचालाखी करत ३० हजार रुपये किमतीची ६ ग्रॅमची अंगठी घेऊन दुचाकी वरून पळून गेले. छगन खैरनार यांनी आरडाओरड केली. परंतु तोपर्यंत दोघे भामटे दुचाकीवरून पसार झाले होते.
यासंदर्भात शुक्रवारी २० जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल रामदास पावरा करीत आहेत.