मुंबई (वृत्तसंस्था) कोरेगाव-भीमा हिंसाचार व माओवादी संबंधाच्या प्रकरणात आरोपी असलेले ८१ वर्षीय तेलुगू कवी वरवरा राव यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. राव हे मागील दीड वर्षाहून अधिक काळापासून कारागृहात आहेत.
वरवरा राव यांची काही दिवसांपूर्वीच प्रकृती बिघडल्याने मुंबईतील जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते मागील महिन्यात तळोजा तुरुंगात बेशुद्ध पडल्यानंतर त्यांना उपचारांसाठी मुंबईतील जे. जे. रुग्णालयात हलवावे लागले होते. करोनाची चाचणी केल्यानंतर त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला आहे. दरम्यान, त्यांनी आपण आधीच विविध आजारांनी ग्रस्त असून कोरोनामुळे धोका अधिक वाढला असल्याने जामीन द्यावा, अशी विनंती एनआयए न्यायालयात तात्पुरत्या जामिनासाठी केलेल्या अर्जात केली होती. तसेच राव यांच्या जिवाला धोका असल्याने त्यांच्यावर चांगले उपचार करावेत, त्यांना जामीन द्यावा अशी मागणी त्यांच्या परिवाराने केली होती.