तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा

 

मुंबई : वृत्तसंस्था । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दुसरे चिरंजीव तेजस ठाकरे राजकारणात सक्रिय होणार असल्याची चर्चा पुन्हा सुरु झाली आहे आज शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’ वृत्तपत्रात त्यांच्या  वाढदिवसानिमित्ताने छापून आलेल्या जाहिरातीमुळे या चर्चेला खतपाणी मिळालं आहे.

 

 

२०१९ मध्ये महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झालं आणि राज्यात पहिल्यांदाच ठाकरे घराण्यातली व्यक्ती विधान भवनात पोहोचली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यापाठोपाठ त्यांचे पुत्र आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे देखील आधी आमदार आणि त्यानंतर राज्याचे पर्यावरण व सांस्कृतिक मंत्री झाले. मात्र आता ठाकरे घराण्यातील तिसरी व्यक्ती अर्थात आदित्य ठाकरे यांचे धाकटे बंधू तेजस ठाकरे देखील महाराष्ट्राच्या राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडून आणि खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून जरी त्याचा इन्कार केला जात  असतो

 

उद्धव ठाकरे यांचे धाकटे चिरंजीव तेजस ठाकरे यांचा आज जन्मदिवस आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांन ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रामध्ये एक जाहिरात छापली असून, याच जाहिरातीवरून मोठी राजकीय चर्चा सुरू झाली आहे. या जाहिरातीमध्ये मिलिंद नार्वेकर यांनी तेजस ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यासोबतच त्यांनी तेजस ठाकरे यांना “ठाकरे कुटुंबाचा व्हिव्हियन रिचर्ड्स” म्हटल्यामुळे खरी राजकीय चर्चा सुरू झाली. खुद्द मिलिंद नार्वेकर यांनी जरी या जाहिरातीमागे राजकीय हेतू नसल्याचं सांगत चर्चा फेटाळून लावली असली, तरी तेजस ठाकरेंना व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा दिल्यामुळे त्याचे राजकीय अर्थ काढले जात आहेत.

 

तेजस ठाकरे लवकरच राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा याआधीही अनेक प्रसंगी झाल्या आहेत. राज्यात महाविकासआघाडीचं सरकार येण्यापूर्वी एका जाहीर प्रचारसभेत उद्धव ठाकरेंसोबत तेजस ठाकरे देखील उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या राजकीय प्रवेशाविषयी पत्रकारांनी विचारणा केली असता “तेजस फक्त प्रचारसभा पाहण्यासाठी आला आहे. तो घरापेक्षा जंगलातच जास्त वेळ घालवत असतो”, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी ती शक्यता फेटाळून लावली होती.

 

आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाल्यानंतर त्यांच्याकडची युवासेना प्रमुख पदाची जबाबदारी तेजस ठाकरे यांच्याकडे सोपवली जाणार असल्याची चर्चा देखील रंगू लागली होती. मुंबई विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुकांमध्ये आदित्य ठाकरेंनी यश मिळवल्यानंतर अभिनंदनाच्या बॅनर्सवर त्यांच्यासोबतच तेजस ठाकरेंचे फोटो देखील झळकले होते. त्यामुळे बॅनर्सवर एंट्री झालेल्या तेजस ठाकरेंची मुख्य राजकीय प्रवाहात देखील लवकरच एंट्री होणार असल्याची चर्चा मुंबईच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली होती. त्यानंतर आता सामनामध्ये मिलिंद नार्वेकरांनी दिलेली ही जाहिरात आणि तेजस ठाकरेंना दिलेली व्हिव्हियन रिचर्ड्स यांची उपमा यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे. तेजस ठाकरेंची राजकीय चर्चा घडवून आणल्यानंतर त्यांचा प्रवेश जाहीर करण्याची योजना असू शकते, अशी शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

 

१७ ऑक्टोबर २०१० रोजी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यामध्ये बाळासाहेबांचा आशिर्वाद घेऊन आदित्य ठाकरेंनी सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला. याच मेळाव्यात “उद्धवचा दुसरा मुलगा तेजस कडक (आक्रमक) डोक्याचा पोरगा आहे. माझ्यासारखाच आहे. मला जी आवड आहे ती त्याला आवड आहे. मला बागकाम आवडतं अन् त्यालाही. मला माशांच काम म्हणजेच मत्स्यालय आवडतं. मी कुत्री पाळलीयत. ती आवड त्यालाही आहे”, असं म्हणाले होते.

 

Protected Content