नवी दिल्ली : वृत्तसंस्था । देशामधील तरुंगांमधील कैद्यांनाही कोरोनाची लागण होत आहे. याच रुग्णांवर उपचार करण्याची परवानगी मागण्यासाठीचा अर्ज दहशतवादी कारवायांच्या आरोपावरून तिहार तुरुंगामध्ये कैदेत असणाऱ्या एका डॉक्टरने केला आहे.
पाकिस्तानमधील दहशतवादी संघटना अल कायदाचा सदस्य असून दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याच्या आरोपांखाली हा अर्ज करणारा डॉक्टर तुरुंगामध्ये आहे. दिल्ली सत्र न्यायालयामध्ये अर्ज करणाऱ्या या डॉक्टरचं नाव सबील अहमद असं आहे. विशेष न्यायालयात सबीलकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
ब्रिटनमधील ग्लासगो विमानतळावर २००७ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अहमदचा सहभाग असल्याचा आरोप आहे. सौदी अरेबिया आणि ब्रिटनमधील दहशतवादी कारवायांमध्ये हात असल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आलीय. भारत आणि परदेशातील अल कायदाच्या सदस्यांना आर्थिक व इतर मदत केल्याच्या आरोपावरून २२ फेब्रुवारी रोजी अहमदला दिल्लीतील विशेष पोलीस पथकाने अटक केली. सध्या तिहार येथील मध्यवर्ती कारागृहात त्याला ठेवण्यात आले असून आरोप निश्चिती आणि त्यांच्यावरील खटला सत्र न्यायालयात अद्याप प्रलंबित आहे. कैद्यांमधील वाढत्या कोरोनाच्या फैलावामुळे तुरुंग प्रशासनाला मदत करण्याची माझी इच्छा असल्याचं पेशाने डॉक्टर असलेल्या अहमदने याचिकेत म्हटलं आहे. ॲड. एम. एस. खान यांच्यामार्फत दिल्लीतील सत्र न्यायालयात त्याने अर्ज केला आहे.
आपल्या अशीलाला रूग्णांना हाताळण्याचा व त्यांच्यावर उपचार करण्याचा अनुभव असून त्याच्या या कौशल्याचा उपयोग तुरुंगातील कैद्यांसाठी होऊ शकतो, म्हणूनच कैद्यांवर उपचार करण्याची परवानगी सबीलला देण्यासंदर्भात तुरुंग अधीक्षकांना निर्देश द्यावेत अशी विनंती खान यांनी याचिकेद्वारे न्यायालयाला केली आहे. अहमद एमबीबीएस डॉक्टर असून त्यांच्याकडे सात वर्षांचा अनुभव असल्याचा दावाही वकिलांनी याचिकेत केला आहे. या याचिकेवर विशेष न्यायालयाचे न्या धर्मेंदर राणा यांच्यासमोर १५ मे रोजी सुनावणी होणार आहे.