तुकाराम मुंडेंच्या समर्थनासाठी लोक रस्त्यावर

 

नागपूर,  वृत्तसंस्था । महापालिका आयुक्तपदावरून बदली करण्यात आलेले तुकाराम मुंढे आज नागपूरहून मुंबईकडे रवाना झाले. त्यांना निरोप देण्यासाठी चाहत्यांनी त्यांच्या घराबाहेर तुफान गर्दी केली होती. घोषणा देण्यात आल्या. ‘वुई वॉण्ट मुंढे साहेब… आगे आगे मुंढे, पीछे पड गये गुंडे… वंदे मातरम्…’ अशा घोषणा लोक देत होते. मुंढे यांच्या बदलीसाठी आग्रही असलेल्या राजकारण्यांनाही लोकांनी लक्ष्य केले. नागपूरचे महापौर संदीप जोशी यांच्या विरोधात ‘मुर्दाबाद, मुर्दाबाद’ अशा घोषणाही लोकांनी दिल्या.

मुंढे सात महिने नागपूर महापालिकेचे आयुक्त होते. या काळात त्यांनी घेतलेल्या निर्णयांमुळं नागपूरकरांची मने जिंकली होती. त्यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरणावर नियुक्ती झाली होती. अवघ्या १५ दिवसांत ती बदलीही रद्द झाली आहे. त्यांना कोणती नवी जबाबदारी मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र, नागपूरमधून त्यांनी मुक्काम हलवला आहे. मुंढे नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. आज ते मुंबईकडे रवाना झाले. तत्पूर्वी, फेसबुक पोस्ट शेअर करून त्यांनी नागपूरकरांचे सहकार्याबद्दल आभार मानले. नागपुरातून निघण्यापूर्वी मुंढे यांनी काही नागरिकांच्या भेटीही घेतल्या.

Protected Content