मुंबई : वृत्तसंस्था । राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाने तयारी सुरु केली असून ऑक्सिजन खाटांसह ३० टक्के खाटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
लहान मुलांसाठी १० टक्के खाटा राखीव ठेवताना ३०० बालरोग तज्ज्ञांची नियुक्ती केली जाणार आहे.
पहिल्या लाटेत साडेतीन लाख रुग्णसंख्या नोंद आहे तर दुसऱ्य़ा लाटेत हिच संख्या दुप्पट म्हणजे सुमारे सात लाख ८० हजार एवढी वाढली. तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकार व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या अंदाजात तफावत आढळून येते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंदाजानुसार तिसऱ्या लाटेत राज्यात साडेअकरा लाख ते बारा लाख एवढे रुग्ण असतील तर राज्याच्या आरोग्य विभागाचा अंदाज हा साडेदहा लाख रुग्ण एवढा आहे. या वाढत्या रुग्णसंख्येच्या शक्यतेचा विचार करून आरोग्य विभागाने उपचाराची नवी रणनिती आखली यात लहान मुलांवरील उपचाराला तसेच म्युकरमायकोसीससारखे अन्य आजारांचा विचार करण्यात आला आहे. यासाठी उपचारांचे प्रोटोकॉल नव्याने तयार करण्यात आले असून रुग्ण चाचणीसाठी प्रयोगशाळा संख्या न वाढवता चाचण्या करण्याची क्षमता वाढविण्यावर भर देण्यात आला आहे. रुग्णांना वेळेत दाखल होता यावे यासाठी ११०० नवीन रुग्णवाहिका घेण्यात येणार असून यातील १०० रुग्णवाहिका या ‘सीएसआर’च्या माध्यमातून मिळाल्याचे आरोग्य विभागाचे अतिरिक्त संचालक डॉ सतीश पवार यांनी सांगितले.
सध्या आरोग्य विभागाकडे २३०० रुग्णवाहिका असून त्यातील १९०० रुग्णवाहिका जुन्या झाल्या आहेत तर जवळपास १४०० रुग्णवाहिका या मोडित काढण्याएवढ्या जुन्या झाल्या आहेत. वेळेत चाचण्या व निदान होऊन रुग्ण लवकरात लवकर रुग्णालयात दाखल होणे तसेच रुग्णालयात आवश्यक उपचार तात्काळ मिळणे हा आमच्या रणनीतीचा भाग आहे. त्यामुळेच आरटीपीसीआर व अँन्टिजेन चाचण्या जास्तीत जास्त करणे आणि रुग्णवाहिकेच्या माध्यमातून तात्काळ रुग्णाला उपचारासाठी दाखल करण्याला आम्ही प्राधान्य दिल्याचे डॉ सतीश पवार यांनी सांगितले. यामुळे एकीकडे ११०० नवीन रुग्णवाहिका घेताना सध्यापेक्षा ६० हजाराहून अधिक चाचण्या करण्याचे आमचे लक्ष्य आहे. आजघडीला राज्यात दोन लाख ९५ हजार चाचण्या होत असून आगामी काळात साडेतीन लाख चाचण्या करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातही ७० टक्के आरटीपीसीआर व ३० टक्के अँटिजेन चाचण्या असे प्रमाण ठेवण्याचा आमचा प्रयत्न राहिल. यासाठी १२ नवीन प्रयोगशाळा सुरु करण्यात येणार असून आहे त्या प्रयोगशाळांची क्षमता वाढविण्यावर आमचा भर राहिल ,असेही डॉ पवार म्हणाले.
तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ प्रदीप व्यास यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाच्या अनेक बैठका झाल्या. यातूनच रुग्ण व्यवस्थापन बळकट करणे, लहान मुलांची व्यवस्था, एकूण खाटा तसेच ऑक्सिजन खाटांचा संख्या वाढवणे, वेगवेगळ्या चाचण्या आदीवर निर्णय घेण्यात आले. सध्याच्या व्यवस्थेत ३० टक्के खाटा वाढविण्यात येणार असून १८ टक्के ऑक्सिजन खाटा वाढविल्या जातील तर तीन टक्के व्हेंटिलेटर वाढविण्यात येणार आहेत. सर्वात म्हत्वाचे म्हणजे ‘सीसीसी’, डिसीअचसी व ‘डिसीएच’ या तिन्ही रुग्ण व्यवस्थेत सर्व ऑक्सिजन, व्हेंटिलेटर खाटा उपलब्ध असणार आहेत. आजघडीला राज्यात ३,३८,५३० खाटा आहेत. यात १,३५,११७ खाटा कोरोना संशयित रुग्णांसाठी आहेत ऑक्सिजन खाटा १,०६,४७५ आहेत. अतिदक्षता विभागात ३२,२१५ खाटा तर १२,६१६ व्हेंटिलेटर खाटा आहेत. याशिवाय १४ लाख ३२ हजार ६४४ पीपीई किट आणि २२ लाख ८९,६३३ एन ९५ मास्क शिल्लक आहेत.
प्रत्येक ठिकाणी किती औषधसाठा उपलब्ध असला पाहिजे याबाबत राज्य कृती दलाच्या डॉक्टरांशी चर्चा करून नियोजन केले जाईल.दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन पुरवठा रुग्णांना कमी पडल्याचे लक्षात घेऊन स्टोरेज टँक, ड्युरा व जम्बो सिलिंडरची स्वतंत्र व्यवस्था करण्यात येत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ‘पीएसए’ प्लांट उभारण्याबरोबर १५ हजार ऑक्सिजन कॉन्सट्रेटरची व्यवस्था करण्यात येणार आहे. पाच लिटर व १० लिटरच्या कॉन्सट्रेटरच्या माध्यमातून अतिदक्षता विभागातील बहुतेक रुग्णांची व्यवस्था होईल. राज्यात सध्या १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होते. दोन हजार मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मितीचे शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. सध्याचा १२०० मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा अधिक पीएसए च्या माध्यमातून ७०० मेट्रिक टन ऑक्सिजन आणि कॉन्सट्रेटरच्या माध्यमातून ३०० मेट्रिक टन ऑक्सिजन अशी व्यवस्था तयार होत असल्याने आगामी काळात रुग्णवाढ झाल्यास ऑक्सिजनची अडचण येणार नाही, असेही डॉ सतीश पवार यांनी सांगितले. लहान मुलांची संख्या तिसऱ्या लाटेत वाढेल असा अंदाज असल्याने १० टक्के खाटा या सध्याच्या व्यनस्थेत वाढविण्यात येतील. तीनशे बालरोगतज्ज्ञांच्या नियुक्तीबरोबर कलर डॉपलर, टूडी इको, पल्स ऑक्सिमीटर,रक्तदाब मोजणारी यंत्र लहान मुलांसाठीची विकत घेतली जाणार आहे. रुग्णशोधापासून उपचारात गतिमानता आणून कमीत कमी मृत्यू होतील याची काळजी घेतली जाणार असल्याचे डॉ पवार यांनी सांगितले.