मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राज्यातील गतीमान घडामोडींच्या पार्श्वभूमिवर, शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेऊन आज आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट केली.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर संजय शिरसाठ यांनी पत्रकार परिषद घेतली. यात ते म्हणाले की, अजित पवार हे कधीपासूनच नाराज होते. त्यांच्या मुलाचा पराभव झाला. यानंतर ते उपमुख्यमंत्री झाले तरी त्यांना सन्मान मिळाला नाही. काही कामांसाठी उद्धव ठाकरे यांची भेट अजित पवार यांनी अनेकदा मागितली होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भेट दिली नाही. आजही महाविकास आघाडीच्या सभांमध्ये अजित पवार यांचे स्थान शोधावे लागते. अजित पवार स्वतःचा गट घेऊन आमच्यासोबत सत्तेत आले तर त्यांचे स्वागतच करू. मात्र, राष्ट्रवादी कॉंग्रेस म्हणून पाठिंबा देत असतील तर शिवसेना सत्तेत राहणार नाही, अशी स्पष्ट भूमिका आमदार संजय शिरसाट यांनी मांडली.
आमदार संजय शिरसाट म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते म्हणून अजित पवार काही आमदारांना घेऊन भाजपसोबत जाणार असतील तर आम्ही शिवसेना सत्तेत राहणार नाही. मात्र, स्वतः गट घेऊन अजित पवार भाजप किंवा शिवसेनेत येणार असतील, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. केवळ अजित पवार नाही, तर कॉंग्रेसमध्येही चलबिचल सुरू असल्याचा दावाही संजय शिरसाट यांनी केला.