नवी दिल्ली, वृत्तसंस्था । बँक कर्मचाऱ्यांनी कामाचं समान वेतन, कामाची निर्धारित वेळ, पेन्शन, पाच दिवसांचा आठवडा अशा मागण्यांसाठी नुकतेच आंदोलन पुकारलं होते. मात्र, त्यानंतरही सरकारकडून मागण्यांची पूर्तता होत नसल्याने कर्मचारी पुन्हा एकदा संपाचे हत्यार उपसण्याच्या तयारीत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बँक कर्मचारी तीन दिवसांचा संप पुकारू शकतात. ११ मार्च ते १३ मार्चदरम्यान कर्मचाऱ्यांनी संपाचा कालावधी निवडला आहे. १४ मार्च रोजी दुसरा शनिवार आणि १५ मार्च रोजी रविवार असल्यामुळे बँक बंद राहणार आहेत. त्यामुळे मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात सलग पाच दिवस बँकांची दारे बंद राहण्याची शक्यता आहे.
या कालावधीत सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागू शकते. एटीएममध्ये पैशांचा तुडवडा पडू शकतो. त्यामुळे शक्यतो सर्वसामान्य नागरिकांनी मार्च महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात बँकेची सर्व कामे पूर्ण करावीत. बँक कर्मचारी फेडरेशन ऑफ इंडिया (BEFI) आणि ऑल इंडिया बँक कर्मचारी संघटना (AIBEA) यांच्याकडून संपाला दुजारा देण्यात आला आहे.