मुंबई प्रतिनिधी | भारताच्या स्वातंत्र्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारी अभिनेत्री कंगना राणावत हिने आपण आपल्या वक्तव्यावर ठाम असून ”१९४७ साली नेमके काय घडले याची माहिती आपल्याला द्यावी, आपण पद्मश्री परत करू” अशी भूमिका घेतल्याने पुन्हा तिच्यावर टिका करण्यात येत आहे.
अभिनेत्री कंगना राणावत हिने एका कार्यक्रमात ‘भारताला १९४७ साली भीक मिळाली होती, तर २०१४ साली खरे स्वातंत्र्य मिळाले होते’ असे वक्तव्य केल्याने देशभरात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. तिचा निषेध करण्यात येत असून तिला प्रदान करण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी होत आहे. यावर तिने आज इन्स्टाग्रामवरील स्टोरीच्या माध्यमातून पुन्हा एकदा भाष्य करत आपल्या या वक्तव्याचे पुन्हा समर्थन केले आहे.
कंगनाने या स्टोरीत म्हटले आहे की, ”त्या मुलाखतीत सगळ्या गोष्ट मी स्पष्टपणे म्हटल्या. १८५७ मध्ये स्वातंत्र्यासाठी पहिला संघटित संघर्ष झाला. सोबत सुभाष चंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकरांनी बलिदानावरही भाष्य केलं. १९८७ बद्दल मला माहीत आहे. पण १९४७ मध्ये कोणता लढा देण्यात आला त्याची मला माहिती नाही. जर कोणी माझ्या माहितीत भर घातली, तर मी पद्मश्री पुरस्कार परत करून माफी मागेन. कृपया माझी मदत करा.”
यात कंगनाने पुढे म्हटले आहे की, ”मी राणी लक्ष्मीबाई सारख्या शहिदाच्या आयुष्यावर आधारित फीचर फिल्ममध्ये काम केलं आहे. १८५७ च्या पहिल्या स्वातंत्र्य संग्रामावर बरंच संशोधन केलं. राष्ट्रवादासोबतच दक्षिणपंथाचाही उदय झाला. मग हा अचानक तो संपुष्टात कसा आला? गांधींनी भगतसिंगांना का मरू दिलं? नेता बोस यांची हत्या का झाली? त्यांना गांधींचा पाठिंबा मिळाला नाही. फाळणीची सीमा एका इंग्रजानं का आखली? स्वातंत्र्याचा उत्सव साजरा करण्याऐवजी भारतीय एकमेकांच्या हत्या का करत होते? मला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत” असे कंगनाने म्हटले आहे. या माध्यमातून तिने पुन्हा आपल्या वक्तव्याचे समर्थन केले असून यावर सुध्दा तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.