मुंबई प्रतिनिधी । कोरोनाच्या प्रतिकारासाठी सरकारी उपाययोजनांना लोक प्रतिसाद देत नसल्याबद्दल शिवसेनेने संताप व्यक्त करून असेच चालत राहिले तर पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांच्या चिंतेला काहीही अर्थ नसल्याचे नमूद केले आहे.
शिवसेनेचे मुखपत्र असणार्या दैनिक सामनात आज कोरोनावर पुन्हा एकदा भाष्य करण्यात आले आहे. यात म्हटले आहे की, लॉकडाऊनला जनता गंभीरपणे घेताना दिसत नाही ही चिंतेची बाब आहे. चिंतेची बाब तर आहेच़ कारण लोकांच्या मनात भीती, दहशत असेल तरच लोक एखादी गोष्ट गांभीर्याने घेतात. लोकांच्या मनात भीतीचा व्हायरस घुसत असतानाच पंतप्रधानांनी सांगितले, लोकांनी घराच्या बाल्कनीत वगैरे येऊन थाळीनाद करावा व कोरोनाशी झुंज देणार्या आरोग्य सेवकांचे मनोधैर्य वाढवावे. याचा व्हायचा तोच परिणाम झाला. लोकांच्या झुंडीच्या झुंडी नाचत, उड्या मारीत रस्त्यावर उतरल्या व या सगळ्या प्रकारास एक प्रकारे उत्सवी स्वरूप प्राप्त झाले. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य घालवले कोणी? राजकीय पक्षाचे लोक हाती थाळ्या, झेंडे घेऊन चौकाचौकात उतरून घोषणा देऊ लागले. सरकारने १४४ कलम लागू केले त्याची अशा प्रकारे ऐशी की तैशी करणारे आपणच आहोत. आता राज्य सरकारने जे लॉकडाऊन जाहीर केले आहे त्याचे तरी शिस्तीने पालन करून सरकारी यंत्रणेला सहकार्य करणे हे जनतेचे कर्तव्यच आहे.
अग्रलेखात पुढे म्हटले आहे की, एम्सफ या हिंदुस्थानातील सर्वोच्च वैद्यकीय संस्थेच्या डॉक्टर्स मंडळींनी त्यांच्या संचालकांना एक पत्र लिहिले व उत्सवी मंडळीचा मास्क उतरवला आहे. कोरोनाचा सामना करायला आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नाहीत, असे एम्सचे डॉक्टर्स सांगत आहेत. त्यामुळे कोरोनाशी लढणाछया संस्थांकडे शस्त्रे नाहीत, आयुधे नाहीत व ते निःशस्त्र लढत आहेत असे समजायचे काय? कोरोनाविरोधात युद्ध आहे. युद्धात डॉक्टर्स, नर्स, आरोग्यसेवक बिनहत्यार लढत असतील तर कसे व्हायचे? हे चित्र देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील आहे. रविवारी संध्याकाळी देशभरात थाळी संगीतासाठी झालेली गर्दी व उत्सवी वातावरण पाहून इतरांची भीती मेली. कोरोना वैगेरे झूट असल्याचा कीडा त्यांच्या डोक्यात वळवळू लागला. मुंबईतील मुलुंड टोलनाक्यावर सोमवारी सकाळी वाहनांची तोबा गर्दी झाली. ही गर्दी कुठे निघाली आहे? पंतप्रधानांचे आवाहन, १४४ कलम, कोरोनाची भीती याला न जुमानता या गर्दीचा ओघ कोठे निघाला आहे? पंतप्रधान चिंतेत आहेत. आम्ही पंतप्रधानांच्या चिंतेत सहभागी आहोत. लोकांनाही चिंता, गांभीर्य वाटावे असा माहोल नसेल तर पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांच्या चिंतेचा मतलब काय? असा प्रश्न यात विचारण्यात आला आहे.