नवी दिल्ली, वृत्तसंस्था । भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर देशाचे संरक्षण प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी मोठे वक्तव्य केले आहे. लडाखमधील चीनी अतिक्रमण रोखण्यासाठी सैन्य कारवाईच्या पर्यायाचा विचार सुरू आहे, असे बिपिन रावत यांनी म्हटले आहे. भारत-चीनदरम्यानची चर्चा अयशस्वी झाली, तर या पर्यायावर विचार केला जाणार आहे.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि राष्ट्रीय सुरक्षेची जबाबदारी असलेले लोक या प्रयत्नांसोबतच सर्वच पर्यायांवर विचार करत आहेत. चीनी सैन्य पूर्वीच्या स्थितीत मागे जावे हाच या मागील उद्देश असल्याचे रावत म्हणाले.
दोन्ही देशांमधील ही समस्या शांततेच्या मार्गानेच सोडवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे सांगताना, पूर्व लडाखमध्ये सैन्यदलाची पूर्ण तयारी असल्याचे रावत यांनी स्पष्टपणे म्हटले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर विविध दृष्टीकोनामुळे अतिक्रमण होत असते.
संरक्षण दलांचे काम त्यावर लक्ष ठेवणे हे असून अशा प्रकारच्या अतिक्रमणाच्या मार्गाने घुसखोरी होत नाही ना हे पाहून ती रोखणे हे देखील संरक्षण दलांचे काम आहे. हा प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवला जावा असे सरकारला वाटते. मात्र, प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पूर्वस्थिती आणण्याच्या प्रयत्नांना यश आले नाही, तर सैनिकी कारवाईसाठी संरक्षण दले नेहमीच तयार असतात, असे बिपिन रावत म्हणाले.
भारत आणि चीनदरम्यान अनेक चर्चेच्या फेऱ्या झालेल्या आहेत , मात्र पूर्व लडाखमधील तणाव काही केल्या कमी होताना दिसत नाही. चीनने एप्रिल महिन्याच्या पूर्वीच्या स्थितीत पुन्हा जावे, अशी भारताची स्पष्ट भूमिका आहे. सैन्य स्तरावरील चर्चेबरोबरच परराष्ट्र मंत्रालय आणि दोन्ही देशांमधील वर्किंग मॅकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अॅण्ड कोऑर्डिनेशनने देखील चर्चा केलेली आहे.