पणजी : वृत्तसंस्था । आता गोवा सरकारने तरूण तेजपाल यांच्या निर्दोषत्वाविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठवला आहे.
तेहलकाचे मॅगझिनचे माजी संपादक तरुण तेजपाल यांची लैंगिक अत्याचाराच्या आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असून, सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याच्या आरोपावरुन त्यांच्यावर गोवा सत्र न्यायालयात खटला सुरु होता. मात्र अद्याप तेजपाल यांच्या समोरील अडचणी संपल्या नसल्याचे दिसत आहे
तरुण तेजपाल हे तेहलका मॅगझिनचे मुख्य संपादक होते. २०१३मध्ये त्यांनी एका पंचतारांकीत हॉटेलमधील लिफ्टमध्ये आपल्या सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचार केले असा त्यांच्यावर आरोप होता. गोवा पोलिसांनी लैंगिक अत्याचार प्रकरणी तेजपाल यांच्यावर नोव्हेंबर २०१३ मध्ये गुन्हा दाखल केला होता, त्या वेळी त्यांना अटक करण्यात आली होती.
“गोवा सरकार न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध उच्च न्यायालयात दाद मागेल, आम्ही गोव्यात महिलांविरोधात कोणताही अन्याय सहन करणार नाही. आम्ही सत्र न्यायालयाच्या आदेशाला लवकरच उच्च न्यायालयात आव्हान देऊ.” असं गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले होते. त्यांनतर आता गोवा सरकारकडून उच्च न्यायालयात सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल करण्यात आली असून, पीडित महिलेला न्याय मिळेपर्यंत हा खटला आम्ही लढू असं आता सावंत यांनी सांगितलं आहे.
मे २०१४ पासून त्यांना जामिनावर सोडण्यात आले होते. गोव्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने त्यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. यापूर्वी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र निश्चिात करण्यास स्थगिती मागितली होती. पण ती याचिका फेटाळण्यात आली होती.