तरूणांनी स्वतःच्या जबाबदार्‍या, कर्तव्यांचे पालन करावे! – मान्यवरांचा सुर

yuwalmarastra

जळगाव, प्रतिनिधी । आपला भारत देश पुर्वीपासूनच महान आहे. आपल्या देशाला जगात श्रेष्ठ बनविण्यासाठी युवक-युवतींनी सजग राहून स्वतःच्या सामाजिक जबाबदार्‍या आणि कर्तव्यांचे पालन करणे आवश्यक आहे. जेव्हा विद्यार्थी मला स्वतःला घडवायचं आहे असा विचार करून प्रत्यक्षात कार्याला सुरूवात करतील तेव्हाच देश घडवता येईल असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.

केंद्रीय युवा कार्यक्रम आणि खेळ मंत्रालय अंतर्गत नेहरू युवा केंद्र जळगावतर्फे मंगळवारी रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयात खंडस्तरीय पडोस युवा संसद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या बेटी बचाओ, बेटी पढाओ, जनधन योजना, जलयुक्त शिवार, एक भारत, श्रेष्ठ भारत, स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अशा विविध उपक्रमांची माहिती देवून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. प्रसंगी आकाशवाणीचे समालोचक ज्ञानेश्वर बोबडे, युवा वक्ते अमरसिंग राजपूत, प्राचार्य डॉ.ए.जी.मॅथ्यू, रायसोनीचे जनसंपर्क अधिकारी बापुसाहेब पाटील यांनी मार्गदर्शन केले.

नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, लेखापाल अजिंक्य गवळी, रायसोनी इस्टीट्यूटचे संचालक प्रितम रायसोनी, संचालिका प्रा.डॉ.प्रिती अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक नेहरू युवा केंद्राचे सहकारी आकाश धनगर यांनी तर सूत्रसंचालन व आभार चेतन वाणी यांनी मानले.
अमरसिंग राजपूत म्हणाले की, शासनाच्या योजनांची विशेषतः युवकांसाठी राबविल्या जाणार्‍या उपक्रमांची नेहरू युवा केंद्रातर्फे नेहमी जनजागृती करण्यात येत असते. शासनाच्या योजनांपैकी एक असलेल्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालयाचा उपयोग केल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत हे आपल्याला सांगावे लागते ही देशासाठी मोठी लाजिरवाणी बाब आहे. आजकाल तरूणाईला कॉपी, पेस्ट करायची सवय लागली आहे. दुसर्‍यांचे अनुकरण करणे सोडून युवा जेव्हा स्वतः देशहिताचा विचार करेल तेव्हाच श्रेष्ठ भारत निर्माण होवू शकेल. स्त्री-पुरूष समानता आजही प्रत्यक्षात लागू होत नाही. स्त्री-पुरूष भेदभावाची सुरूवात घरापासूनच होते. महिला कामात मग्न असते तर पुरूष टि.व्ही.समोर बसलेले असतात. जेव्हा दोघांना एकाच पातळीवर ठेवून विचार केला जाईल तेव्हाच बेटी बचाओ, बेटी पढाओ खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल, असे राजपूत यांनी सांगितले.

आकाशवाणीचे ज्ञानेश्वर बोबडे यांनी सांगितले की, युवकांच्या प्रतिभा हेरून त्यांच्या कलागुणांना वाव देण्याचे काम नेहरू युवा केंद्रातर्फे करण्यात येत असते. अलीकडे नो मीन्स नो हा ट्रेंड मोठ्याप्रमाणावर सुरू आहे. परंतु मुली निवडक गोष्टींना विरोध करतात. आपल्या मनाला न पटणार्‍या प्रत्येक चुकीच्या गोष्टींना विरोध करायला हवा. मग त्यात हुंडा आणि शिक्षण न घेवू देणे याचा देखील समावेश होतो. मुलगी जेव्हा स्वतःचा निर्णय स्वतः घेते तेव्हाच ती सक्षम होते. आज तुमच्या मदतीला छत्रपती शिवाजी महाराज किंवा सावित्रीबाई फुले येणार नाही तर तुम्हालाच स्वतःला सावित्रीबाई व्हावे लागेल असे मत त्यांनी मांडले.

प्राचार्य ए.जी.मॅथ्यू म्हणाले की, आपल्याकडे जातीधर्माचा मोठा पगडा आहे. डोक्यातून जात धर्म बाहेर पडल्याशिवाय श्रेष्ठ भारताचा विचार मनात येणार नाही. देशाला निर्मल करण्यासाठी अगोदर स्वतःला निर्मल व्हावे लागले. त्यामुळे तरूणाईने व्यसनांपासून स्वतःला दूर ठेवावे, असे आवाहन त्यांनी केले. रायसोनी महाविद्यालयाचे जनसंपर्क अधिकारी बापूसाहेब पाटील यांनी, विविध शासकीय उपक्रम आणि योजनांच्या जनजागृतीसाठी सोशल मिडीयाचा योग्य प्रकारे उपयोग करता येईल परंतु त्यासाठी विद्यार्थ्यांनी सोशलमिडीयावर फालतू वेळ न घालविता त्याचा योग्य उपयोग करणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी आठवड्यातील एक दिवस विधायक उपक्रम राबविण्यासाठी देणे आवश्यक आहे. रविवारी सुट्टीच्या दिवशी नागरिकांना स्वच्छतेचे आणि जनधन योजनेचे महत्त्व पटवून देण्यासाठी विद्यार्थ्यांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.

Protected Content