ठाणे (वृत्तसंस्था) घरातून पळून जाऊन लग्न करण्यासाठी, तरुणीने आपल्या प्रियकरच्या मदतीने स्वत:च्याच घरातून तब्बल १३ लाख रुपयांचे दागिने चोरल्याच्या घटनेचा भिवंडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीला प्रियकरासह अटक केली असून मुलीला घरातूनच तर प्रियकराला धुळ्यातून ताब्यात घेतले आहे.

भिवंडीतील कामतघर येथील अष्टविनायक या इमारतीच्या फ्लॅटमध्ये, बनावट चावीच्या सहाय्याने दरवाजा उघडून १३ लाख २१ हजार रुपये किमतीचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी २२ जुलै रोजी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. पोलिसांनी तपास करुन, संबंधित घरमालकाची मुलगी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. लॉकडाऊन काळात बहुसंख्य कुटुंबीय घरातच असतांना या इमारतीत दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याने पोलिसांना सुरुवातीपासूनच संशय होता. घरफोडी करणाऱ्या अज्ञात चोरट्यांनी बनावट चावीने लॅच लॉक उघडून ही चोरी केली होती. त्यामुळे ही चोरी घरातील अथवा माहितीतील जवळच्या व्यक्तीचा समावेश असणार, असा देखील संशय पोलिसांना होताच. पोलिसांनी मोबाईल तपासून कॉल रेकॉर्ड चेक केल्यानंतर, मुलीने तिच्या प्रियकराशी सतत कॉल केल्याचे समोर आले. त्यानंतर अधित तपास केला असता, दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला. तसेच भविष्यातील आर्थिक तरतूद म्हणून दोघांनी घरातील सोने-चांदीचे दागिने, रोख रक्कम चोरली. पोलिसांनी संबंधित तरुणीचा प्रियकर आणि त्याच्या मित्राला धुळ्यातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ५५ हजार रोख आणि ८ लाख ९६ हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत.


