रायपूर : वृत्तसंस्था । लॉक डाउन असून पण मोटारसायकलवर फिरणाऱ्या आणि चौकशीत समाधानकारक कारण न सांगणाऱ्या तरुणाच्या कानशिलात लागवणाऱ्या जिल्हाधिकाऱ्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी बडतर्फ केले आहे
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत होता. या व्हिडिओमध्ये जिल्हाधिकारी भररस्त्यावर तरुणाला कानशिलात लगावताना दिसत आहे. तरुणाला कानशिलात लगावणारे छत्तीसगडच्या सूरजपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांना गैरवर्तणुकीबद्दल तातडीने पदावरून हटवल्याचं छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी जाहीर केलं आहे. आयएएस अधिकारी रणबीर शर्मा यांनी एका व्हिडिओ तून माफी देखील मागितली आहे. देशातील आयएएस वर्तुळातूनही रणबीर शर्मा यांच्या या वर्तनावर नाराजी व्यक्त केली जात आहे.
सूजरपूर जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन लागू आहे. मात्र, तरीदेखील अनेकांकडून लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केलं जात असल्याचं दिसून येत आहे. २३ वर्षीय तरूण बाईकवरून जात असताना जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांनी तरुणाला हटकलं. तरुणाने आधी आपण लस घेण्यासाठी जात असल्याचं सांगितलं. पण त्याच्याकडची पावती ही लसीकरणाची नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पुन्हा आपण वृद्ध आजीला भेटायला जात असल्याचं सांगितलं. पण तरुणाच्या खोटेपणामुळे संतप्त झालेल्या रणबीर शर्मा यांनी त्याचा फोन जमिनीवर आपटून फोडला त्याच्या कानशिलात देखील लगावली. त्यांनी आपल्यासोबतच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही तरुणाला मारण्यास सांगितलं.
हा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल झाल्याची दखल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी घेतली. “सोशल मीडियावर सूरजपूरचे जिल्हाधिकारी रणबीर शर्मा यांच्याकडून एका तरुणाशी गैरव्यवहार केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही निंदनीय घटना आहे. छत्तीसगडमध्ये असा कोणताही प्रकार सहन केला जाणार नाही. रणबीर शर्मा यांना तातडीने हटवण्याचे निर्देश आले आहेत”, असं ट्वीट मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलं आहे.
दरम्यान, रणबीर शर्मा यांनी देखील काय घडलं ते सांगताना माफी मागितली आहे. “जेव्हा मी त्यांना थांबवलं, तेव्हा ते म्हणाले की मी लस घेण्यासाठी जातो आहे. त्यांनी पावती दाखवली जी लसीकरणाशी संबंधित नव्हती. नंतर ते म्हणाले की मी माझ्या आजीला पाहायला जात आहे. त्यांनी गैरवर्तन केलं आणि मी रागात त्याला कानशिलात लगावली. मी माझ्या या वर्तनासाठी माफी मागतो”, असं रणबीर शर्मा यांनी म्हटलं आहे.