जळगाव प्रतिनिधी ।कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील तक्रार निवारण समितीच्या अध्यक्षपदाची केलेली नेमणूक ही चुकीच्या पद्धतीने केली असल्याचा आरोप करत या प्रकरणी कार्यवाही न झाल्यास एनमुक्टो संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
तत्कालीन अध्यक्ष सुधाकर व्यव्हारे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने नागपूर येथील बाल न्यायालयाच्या सेवानिवृत्त न्यायाधीश मीरा खाडंतकर यांची नियुक्ती केली होती. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार तक्रार निवारण समिती अध्यक्ष हे कमीत कमी सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधिश दर्जाचे असणे आवश्यक आहे. कौटुंबीक न्यायालयाच्या मुख्य न्यायाधिश हे जिल्हा न्यायाधीश नसतांना मीरा खाडंतकर यांची चेअरमनपदी नेमणूक करण्यात आलेली आहे. शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी गठीत केलेल्या उपन्यायिक समितीचे अध्यक्ष त्या पदासाठी लागणारी अर्हता पूर्ण करत नसतील तर त्यांनी दिलेले सर्व निकाल वरिष्ठ न्यायालयात ग्राह्य धरले जाणार नाहीत. परिणामी कर्मचाऱ्यांना न्याय तर मिळणे दूरच परंतु त्यांचा वेळ आणि पैसा वाया जाईल अशी तक्रार एनमुक्टो संघटनेने केली. तत्कालीन अध्यक्ष सुधाकर व्यव्हारे यांच्या राजीनाम्यास कारणीभूत ठरणार्यांवरही कारवाईची मागणी केली आहे. यासंबधी संघटनेने कुलपतींसह कुलगुरूंना निवेदने देऊन चर्चा केली आहे; मात्र कार्यवाही केेली नाही. यामुळे एन. मुक्टो समितीच्या २७ ऑगस्टला होणार्या सभेच्या दिवशी कुलगुरु दालनाबाहेर घंटानाद करू असा इशारा एनमुक्टोचे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. अनिल पाटील, कार्याध्यक्ष प्रा. डॉ. ई. जी. नेहते यांनी दिला आहे.