चाळीसगाव, प्रतिनिधी । डॉ. हरिष दवे यांनी जागतिक दृष्टिदान दिनाचे औचित्य साधून सह्याद्री प्रतिष्ठानचे जळगाव जिल्हा प्रशासक गजानन मोरे व सामाजिक कार्यकर्ते देवेनभाऊ पाटील यांच्याकडे मरणोत्तर देहदानाचा फॉर्म भरून देऊन आपला संकल्प निश्चित केला आहे.
मानवी जीवन आज हे अत्यंत धकाधकीचे व धावपळीचे झाले असून यामध्ये कुठले व्याधी कुठला आजार होईल व शरीराचा कुठला भाग निकामी होईल याची कोणतीही शाश्वती नाही. अशा याप्रसंगी माणसास आपल्या शरीराचा निकामी भाग जर पुन्हा दुसऱ्या मानवी देहाकडून मिळाला तर तो त्यासाठी दैवयोग म्हणावा लागेल. याच उदात्त हेतूने शहरातील प्रसिद्ध आयुर्वेद तज्ञ डॉ. हरिष रमाकांत दवे यांनी आज मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प केला आहे. आपल्या मृत्यूनंतरही आपला देह कुणाच्यातरी उपयोगात यावा व या जगामध्ये कुणाच्या तरी शरीरातील अवयव म्हणून आपण सतत जिवंत रहावे हा उदात्त हेतू यामागे डॉ. दवे यांचा आहे. मृत्यूनंतर शरीर जाळले जाते आणि त्याची राख होते ही राख होऊन वाहून न जाता हा देह लोक उपयोगासाठी सतत उपयोगात यावा हा डॉ. दवे यांचा विचार आज समाजामध्ये खरोखर अंमलांत आणण्याची गरज भासत असल्याने त्यांच्या या संकल्पाचा समाजातील सर्व स्तरातून कौतुक व स्वागत होत आहे.