मुंबई : वृत्तसंस्था । २०१३ साली घडलेल्या डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडातील आरोपी विक्रम भावे याला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. भावे सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात तुरुंगवासात आहे. एक लाख रुपये भरल्यानंतर त्याची सुटका होणार आहे.
न्या एस.एस. शिंदे आणि न्या मनिश पितळे यांच्या विभागीय खंडपीठाने सांगितलं की भावेला न्यायालयाच्या परिक्षेत्राबाहेर जाता येणार नाही. त्याला आठवडाभर रोज पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागेल. त्याचसोबत पुढचे दोन महिने त्याला आठवड्यातून दोन वेळा पोलीस स्टेशनमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे. त्यानंतर ही सुनावणी पूर्ण होईपर्यंत त्याला दर आठवड्याला हजेरी द्यावी लागणार आहे.
केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाने ( सीबीआय ) भावेला डॉ. नरेंद्र दाभोळकर हत्याकांडात अटक केली होती. त्यानंतर त्याने विशेष कोर्टात जामीन अर्ज केला.मात्र, तो फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज केला होता. जामीनाच्या आदेशावर स्थगिती मिळावी ही सीबीआयची मागणी कोर्टाने नाकारली.
२० ऑगस्ट २०१३ रोजी सकाळी डॉ. नरेंद्र दाभोळकर मॉर्निंग वॉक घेत असताना पुण्यातल्या ओंकारेश्वर पुलावर त्यांची हत्या करण्यात आली. या हत्याकांडात सीबीआयने सचिन अंदुरे आणि शरद कळसकर या दोघांना अटक केली होती. भावेला या दोघांना मदत केल्याचा ठपका ठेऊन २०१९ मध्ये अटक करण्यात आली.