जळगाव प्रतिनिधी । कोविडच्या प्रतिकारासाठी गत अनेक महिन्यांपासून अव्याहतपणे लढा देणारे डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या सौभाग्यवती डॉ. वर्षा पाटील व मातोश्री गोदावरीआई पाटील यांनी आज जिल्हा रूग्णालयात कोरोनाची लस घेतली.
सविस्तर वृत्त खालील लिंकवर क्लिक करून वाचा
डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजमध्ये कोविड आणि नॉन-कोविड या दोन्ही प्रकारातील सेवा सुरू आहेत. ११ जूनपासून रूग्णालयात कोविड कक्ष सुरू झाला. हॉस्पीटलचे अध्यक्ष माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सर्व सहकार्यांनी अगदी अहोरात्र परिश्रम करून कोरोनावर मात करण्यासाठी झटून प्रयत्न केले आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रकोप आटोक्यात आणण्यासाठी या हॉस्पीटलने महत्वाची भूमिका पार पाडली आहे. याचमुळे, कोरोनाच्या लसीकरणासाठी डॉ. उल्हास पाटील मेडिकल कॉलेजच्या अधिकारी व कर्मचार्यांची पहिल्या टप्प्यात निवड करण्यात आलेली आहे.
या पार्श्वभूमिवर, आज जिल्हा रूग्णालयात डॉ. उल्हास पाटील, त्यांच्या पत्नी सौ. वर्षा पाटील व मातोश्री गोदावरीआई पाटील यांनी कोरोनाची लस घेतली. या तिघांनी नियमाप्रमाणे लसीकरण करून घेतले. ही लस पूर्णपणे सुरक्षित असून याचे फारसे साईड इफेक्ट होत नसल्याने जनतेने याबाबत गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन डॉ. उल्हास पाटील यांनी याप्रसंगी केले.
लस घेतल्यानंतर सर्व लाभार्थ्यांना अर्धा तास निरीक्षण कक्षात डॉ. डॅनियल साझी, डॉ. हृषीकेश येऊळ, डॉ. प्रदीपकुमार शेट्टी यांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आले. याठिकाणी अधिपरिचारिका अर्चना धिमते, अधिपरिचरिका जयश्री वानखेडे, कुमुद जवंजार, गायत्री पवार, डाटा एंट्री ऑपरेटर प्रदीप बावस्कर, इशांत पाटील, स्वच्छता निरीक्षक अनिल बागलाणे यांनी लसीकरण प्रक्रिया राबविण्याचे यशस्वी नियोजन केले.