जळगाव, प्रतिनिधी । येथील डॉ. अविनाश आचार्य विद्यालयात आज मंगळवार ३ मार्च रोजी लेखक विद्यार्थ्यांच्या भेटीला या उपक्रमा अंतर्गत प्रसिध्द कवी ,लेखक डॉ. अशोक कौतीक कोळी यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या वेळी मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांची उपस्थिती होती.
डॉ.अशोक कोळी यांची ४ थीच्या मराठीच्या पुस्तकात “धुळपेरणी “ही कविता अभ्यासक्रमात आहे. डॉ.अशोक कोळी यांची मुलाखत ४थीच्या खुशी नेमाडे व अमोल पाठक या विद्यार्थ्यांनी घेतली. मुलाखतीच्या माध्यमातून त्यानी मुलांशी संवाद साधला. मुलांनी विविध प्रश्न विचारले. आपणास धुळपेरणी ही कविता कशी सुचली? आपले आवडते पुस्तक कोणते व लेखक कोणते ? लेखनासाठी आपणास कोणाची प्रेरणा मिळाली? अश्या विविध प्रश्नातून डॉ.अशोक कोळी यांचा जीवनपट उलगडण्यात आला. लेखक भेटीस आल्याने मुलां मध्ये उत्साह होता.शालेय जीवनातील गमती जमती डॉ. कोळी यांनी या वेळी सांगितल्या. वाचनाने माणूस अधिक समृद्ध होत असतो. त्यासाठी सर्वानी वाचन करावे.आपण जे वाचतो ते आपण लिहून ठेवायला हवे त्या तुनच आपल्याला लेखनाची सवय लागते असा संदेश डॉ. अशोक कोळी यांनी दिला.या वेळी “धुळपेरणी” ही कविता मुलांनी सादर केली. मुख्याध्यापिका योगिता शिंपी यांच्या संकल्पनेतून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सूत्रसंचालन वंदना सावदेकर तर परिचय केतन वाघ यांनी केले. आभार कविता पाटील यांनी मानले. प्रमोद इसे व योगेश जोशी यांनी नियोजन केले.