डॉक्टरांवरील हल्ल्यांकडे पंतप्रधानांनी लक्ष द्यावे ; आयएमएचे आवाहन

 

 

पुणे : वृत्तसंस्था । कोरोना काळात डॉक्टरांवर रुग्ण आणि नातेवाईकांकडून हल्ले होत आहेत. लशीबाबत खोडसाळ माहिती पसरत आहे. हे गंभीर असून पंतप्रधानांनी लक्ष घालावे असे आवाहन इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात आले आहे.

 

इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) च्या राष्ट्रीय शाखेने  मागण्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र दिले रुग्णांच्या सेवेत डॉक्टर कोणतीही कसूर ठेवत नाहीत, तरीही सातत्याने डॉक्टरांना मानसिक आणि शारीरिक हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे.

 

कायद्याचा धाक नसल्याने डॉक्टरांवरील हल्ल्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. हे हल्ले डॉक्टरांचे मानसिक खच्चीकरण करणारे आहेत. त्यांवर चाप आणण्यासाठी तातडीने वैद्यकीय आस्थापना विधेयक २०१९ लागू करावे, जेणेकरून रुग्णसेवेतील डॉक्टरांवर हल्ला करणारे आरोपी १० वर्ष कारावासाच्या शिक्षेस पात्र ठरतील याकडे पंतप्रधानांचे लक्ष वेधले आहे. .

 

देशात लसीकरण सुरू आहे. साथरोगावर मात करण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवण्याची गरज आहे. मात्र, लशीबाबत अफवा आणि गैरसमज पसरवण्याचा खोडसाळपणा समाजातील काही गट करत आहेत. त्यामुळे लसीकरणाच्या प्रक्रियेत अडथळे येत आहेत.

 

देशातील अधिकाधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले तरच कोरोना विरुद्ध समूह प्रतिकारशक्ती येणे शक्य आहे. लसीकरणाबाबत गैरसमज निर्माण न करता त्यास प्रोत्साहन देणे आवश्यक आहे, मात्र तसे घडताना दिसत नाही. केवळ लसीकरणच नव्हे तर शास्त्रीय संशोधनाअंती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाची मान्यता न मिळवलेल्या कोणत्याही औषधाची जादूची कांडी म्हणून प्रचार आणि प्रसार करणाऱ्यांवर सरकारने आळा घालावा, असे आयएमएने म्हटले आहे.

 

Protected Content