नवी दिल्लीः वृत्तसंस्था । जुलैच्या मध्यापर्यंत किंवा ऑगस्टपर्यंत दिवसाला १ कोटी नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पुरेसा साठा असेल. डिसेंबरपर्यंत देशाचे लसीकरण पूर्ण होईल, असा विश्वास केंद्र सरकारने व्यक्त केला.
देशातील कोरोनाने निर्माण झालेली स्थिती आणि लसीकरणाच्या प्रगतीवर केंद्र सरकारने आज पत्रकार परिषद घेतली. कोविशिल्ड लस घेण्याच्या कालवाधीत कुठलाही बदल केलेला नाही. कोविशिल्डचा पहिला डोस दिल्यानंतर १२ आठवड्यांनी दुसरा डोस घ्यावा. हा नियम कोवॅक्सिनसाठीही लागू असेल, अशी माहिती आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी दिली.
देशात लसींचा कुठलाही तुटवडा नाही. मुलांना होणाऱ्या संसर्गावर आमचे लक्ष आहे. मोठ्या प्रमाणावर मुलांमध्ये लक्षणंच दिसून येत नाही. त्यांना ससंर्ग होतो. पण त्यांच्यातील लक्षणं ही कमी असतात किंवा शून्य असतात. मुलांमधील संसर्गाने गंभीर स्वरुप घेतलेले नाही. पण संसर्गाने मुलांच्या वर्तनावर बदल होऊ शकतो. मुलांमध्ये प्रभाव वाढू शकतो. पण संसर्ग झालेल्या अतिशय कमी मुलांना हॉस्पिटलमध्ये दाखल करावं लागतं. आम्ही तयारी करत आहोत, असं नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्ही. के. पॉल यांनी सांगितलं.
२९ राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशात रोज ५००० हजारांहून कमी रुग्णांची नोंद होत आहे. २८ एप्रिल ते ४ मेदरम्यान देशात ५३१ असे जिल्हे आहेत जिथे रोज १०० हून अधिक नवीन रुग्णांची नोंद केली जात होती. आता अशा जिल्ह्यांची संख्या ही २९५ इतकी झाली आहे. अॅक्टिव्ह रुग्णांची संख्याही झपाट्याने कमी होत आहे. रोज १.३ लाख अॅक्टिव्ह रुग्ण कमी होत आहेत. ३० राज्ये आणि केंद्र शासित प्रदेशांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण कमी होण्याचा ट्रेंड कायम आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी दिली