डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट ?

पुणे : वृत्तसंस्था । सप्टेंबर महिन्यात कोरोना संसर्गाचा तुलनात्मक उच्चांक कमी झाला आहे. डिसेंबर-जानेवारी महिन्यांत कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता केंद्रीय पथकाने पुणे प्रशासनाला वर्तविली आहे.

आतापर्यंतची सर्वाधिक वाईट वेळ निघून गेली असून, सप्टेंबर इतका प्रभाव दुसऱ्या लाटेत राहणार नाही. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नागपूर ‘एम्स’चे ज्येष्ठ अधिकारी डॉ. अरविंद कुशवाह यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथकाला पाठवले आहे. पथकाने चार दिवसांपासून घेतलेल्या आढाव्यानंतर प्राथमिक अहवाल विभागीय आयुक्त सौरभ राव यांना सादर केला आहे.

यामध्ये येत्या डिसेंबर-जानेवारी महिन्यात दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली आढावा घेण्यासाठी डॉ. कुशवाह यांचा केंद्रीय पथकासह पुण्याचा चौथा दौरा असून, त्यांना पुण्यातील संसर्गाची आणि येथील पायाभूत सुविधांची माहिती आहे.

दसरा-दिवाळीत नागरिकांकडून होणारी गर्दी, एकमेकांच्या घरी जाण्याचे वाढणारे प्रमाण; तसेच पुढील दोन महिन्यांत ‘मिशन बिगीन अगेन’ अंतर्गत बस, रेल्वे; तसेच शाळाही खुल्या होण्याची शक्यता असल्याने संसर्ग वाढणार आहे. थंडीच्या काळात विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. थंडी असल्याने घराच्या दारे-खिडक्या बंद ठेवण्यात येतात. यामुळे प्रादुर्भाव वाढण्यास मदत होणार आहे. या कारणांमुळे दुसरी लाट येण्याची शक्यता आहे. मात्र, ही लाट सप्टेंबर महिन्यांतील प्रादुर्भावाइतकी प्रभावशाली नसेल, असाही अंदाज केंद्रीय पथकाने व्यक्त केला आहे.

 

‘पुण्यात संसर्ग न झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे दुसरी लाट आली तर बाधित न झालेले नागरिक या लाटेत संसर्गाला बळी पडू शकतात. या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली पाहिजे; अशा सूचना केंद्रीय पथकाने दिल्या आहेत.

Protected Content