जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत असलेल्या ठेकेदारांचे प्रलंबित देयके अदा करण्याच्या मागणीसाठी जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने मंगळवारी ११ एप्रिल रोजी दुपारी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लक्षवेधी आंदोलन करण्यात आले.
दिलेल्या प्रसध्दिपत्रकात म्हटले आहे की, सार्वजनिक बांधकाम अंतर्गत जिल्हयातील शासकीय कंत्राटदारांचे सुमारे ३०० कोटी रुपयाचे देयके निधी अभावी थकीत आहे. मार्च २०२३ मध्ये देखील शासनाने प्रलंबित देयके अदा करणेसाठी जिल्ह्यात फक्त ४८ कोटीचा निधी वितरीत केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व नोदणीकृत शासकीय कंत्राटदार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत.
३० मार्च २०२३ रोजी संघटनेचे सुमारे १०० ठेकेदारांनी अधीक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम कार्यालयाबाहेर कार्यालयाबाहेर भीक मांगो आंदोलन केले होते. शासनाकडुन जळगांव जिल्हयासाठी अत्यल्प निधी वितरीत करण्यामागचे नेमके कारण काय याबाबत विचारणा व्हावी. सन २०२० पासून प्रलंबित देयकांचा आकडा वाढतच चालला आहे. केलेल्या कामाचे देयके अदा करण्यासाठी निधी नसतांना मात्र दुसरीकडे शासन शेकडो कोटी रुपयांचे नविन कामांना मंजुरी देत आहे.
जिल्हा मार्ग, इतर जिल्हा मार्ग, ग्रामीण मार्ग, पुल, इमारती कामे यामुळे रखडण्याची दाट शक्यता आहे. संघटनेच्या सर्व शासकीय ठेकेदारांनी प्रलंबित निधी मिळत नाही तोपर्यंत नविन कामांच्या निविदेवर जिल्हाभरात बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या १५ दिवसांत निधी न मिळाल्यास संपुर्ण जळगांव जिल्हयात रस्ते, पुल, इमारतींचे शासकीय कामे बंद करावी लागणार आहे. असा इशारा जळगाव जिल्हा कंत्राटदार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.