ठाकरेंना धक्का : मुंबईतील प्रभाग संख्या आधीप्रमाणेच राहणार

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | मुंबई महापालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी वाढीव नव्हे तर आधीचेच प्रभाग राहणार असल्याचा महत्वाचा निकाल आज न्यायालयाने दिला आहे.

 

मुंबई उच्च न्यायालयाने  आज एक महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. एकनाथ शिंदे सरकारने मुंबई महापालिकेतील प्रभाग रचनेंसंदर्भात काढलेला अध्यादेश कायम ठेवला जावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना घेतलेला प्रभाग संख्येचा निर्णय एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळ बैठकीत फिरवण्यात आला होता. याविरोधात ठाकरे गटाने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज हा निकाल एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या बाजूने लागलाय. त्यानुसार मुंबई महापालिकेतील प्रभागांची संख्या २३६ ऐवजी २२७ राहील.

 

मुंबई महापालिकेत २०१७  मध्ये २२७ जागांसाठी निवडणूक झाली होती. मात्र लोकसंख्येनुसार या जागा वाढवण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. हा निर्णय नंतर एकनाथ शिंदे सरकारने रद्द ठरवला होता. २०१७ च्या निवडणुकीत मुंबई महापालिकेत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष होता. त्यानंतर भाजप आणि कॉंग्रेस हा तिसर्‍या क्रमांकावर होता.

दरम्यान,  राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि महापालिका निवडणुका या आता २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होतील, असा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे मुंबई महापालिकेत सध्याच्या ३३६ सदस्यांऐवजी २२७ सदस्य संख्या होईल, असे जाहीर करण्यात आले.  या निर्णयाविरोधात राजू पेडणेकर यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राजू पेडणेकर हे ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आहेत.

 

आज उच्च न्यायालयाने सदर ठाकरे गटाची याचिका फेटाळून लावली आहे. तर एकनाथ शिंदे सरकारने दिलेला अध्यादेश कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाने मांडलेली भूमिका उच्च न्यायालयाने मान्य केली आहे. न्यायमूर्ती सुनील शुकरे आणि एम डब्ल्यू चंदवाणी यांच्या खंडपीठाने सदर निर्णय दिला.

Protected Content