यावल प्रतिनिधी | ट्रॅव्हल्स बसच्या टपावरील कॅरिअर्सवर केळीची पाने ठेवताना तोल जावून खाली पडल्याने मृत्यू झाला. राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी असे मृताचे नाव आहे.
शहरातील जनता बँकेच्या मागील बाजूस असलेल्या बारी वाड्यातील रहिवासी राजेंद्र ऊर्फ राजू मुकुंदा बारी हे दररोज यावल येथून जाणाऱ्या साई राम ट्रॅव्हल्सच्या बसेसद्वारे केळीची पाने पुणे येथे पाठवण्याचा व्यवसाय करतात.
गुरुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास नेहमीप्रमाणे उभ्या असलेल्या या बसवरील टपावर चढून कॅरिअर्सवर बारी हे केळीच्या पानाचे गठ्ठे बांधत होते. केळी गठ्ठे टाकून बांधत असताना बारी अचानक खाली पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांना जखमी अवस्थेत येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. मात्र रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणी येथील पोलिसांत ट्रॅव्हल्स चालक तेजस लहू पाटील, रा.अमळनेर यांनी दिलेल्या खबरी वरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनात हवालदार अस्लम खान करत आहे. बारी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली, एक मुलगा असा परिवार असून त्यांच्या निधनामुळे शहरात हळहळ व्यक्त हाेत आहे.